माजी खासदार संजय काकडेंनी मेव्हण्याला दिली गोळ्या घालण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

फिर्यादी ऑगस्ट २०१८ मध्ये काकडे यांच्या घरी गेले, तेव्हा काकडे यांनी त्यांना "तुला संपवायला वेळ लागणार नाही" अशा शब्दांत धमकी दिली.

पुणे : उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या सख्या मेव्हण्यालाच थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

मैत्रीत आला दुरावा; स्टोरी काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडची!​

या प्रकरणी युवराज ढमाले (वय ४०, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन संजय काकडे (वय ५२, पत्नी उषा काकडे, वय ४४, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा आणि काकडे यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरू होता. मात्र, २०१० पासून त्यांनी त्यांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यावरुन काकडे आणि फिर्यादी यांच्यात मतभेद झाले. 

मी दाऊद गँगशी कनेक्टेड आहे, प्रकरण महागात पडेल!​

दरम्यान, फिर्यादी ऑगस्ट २०१८ मध्ये काकडे यांच्या घरी गेले, तेव्हा काकडे यांनी त्यांना "तुला संपवायला वेळ लागणार नाही" अशा शब्दांत धमकी दिली. त्यानंतर काकडे यांनी "मी सत्तेत आहे, पाहिजे ते करू शकतो. माझे अनेक गुंडाशी संबंध आहेत, त्यामुळे नीट राहा," असे सांगत त्यांचे मेव्हणे ढमाले यांना धमकावले आहे. 

त्यानंतर पुढच्याच महिन्यात काकडे यांनी ढमाले यांना "तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस. तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन कधी संपवेल, माझे नावही कुठे येणार नाही. तुला गोळ्या घालून आजच संपवेल," अशा शब्दात जिवे मारण्याची धमकी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Sanjay Kakade threatens to shoot his own brother-in-law