esakal | पुणे : झेडपीचे माजी सदस्य सुभाष अमराळे यांचे कोरोनामुळे निधन\

बोलून बातमी शोधा

subhash amarale
पुणे : झेडपीचे माजी सदस्य सुभाष अमराळे यांचे कोरोनामुळे निधन
sakal_logo
By
बंडू दातीर

पौड : पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य सुभाष मारूती अमराळे (वय 68 ) यांचे गुरूवारी (29 एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले. अंबडवेट गावाला आदर्शपण निर्माण करून देणारे, दुग्धव्यवसायातून शेकडो कुटूंबियांची उपजिविका भागविणारे, राजकारणातील संयमी, समन्वयी व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात ते परिचित होते. ते भाऊ नावाने परिचित होते. भाऊंची एक्झिट संपूर्ण मुळशी तालुक्याला चटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाने मुळशी राष्ट्रवादीची मोठी हानी झाली आहे. सुभाष अमराळे यांनी आपल्या अंबडवेट गावाला आदर्श दर्जा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. माजी उपसभापती स्वर्गीय बबनराव नागरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावत सुभाष भाऊंनी विविध विकासकामांच्या योजना, लघु पाटबंधारे, वनीकरण अशा योजना राबविल्या. बबनराव आणि सुभाषभाऊ ही अंबडवेटची अशी जोडगोळी होती की त्यांनी गावातील तंटे पोलिस चौकीत जावू न देता दत्तमंदीरातच बसवून मिटविण्याची परंपरा सुरू केली. त्यांनतर शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाच्या आरोग्य क्षेत्रातील कक्षा रुंदवणार; आरोग्य विज्ञान विद्यापीठसोबत सामंजस्य करार

साडेसात वर्षे गावचे सरपंचपद भूषविताना वाड्यावस्त्यांचा दूरदृष्टीने विकास केला. अमराळे यांनी दूधव्यवसायाला कष्ट आणि चिकाटीची जोड देत एका उंचीवर नेऊन ठेवले. रविवार पेठेतील करपे डेअरीत दूध घालण्यापासून त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. अमराळे डेअऱी नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पौड, चाले याठिकाणी दूध संकलन केले जायचे. त्यावेळी रोज सकाळी उठूऩ सुभाषभाऊ स्वतः हजर असत. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हा व्यवसाय केला. त्यामुळे माले खोरे, कोळवण खोऱ्यातील अनेक कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला. दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दांडगा जनसंपर्क आला. तालुक्याबरोबरच कोथरूड येथेही त्यांनी डेअरीचे काम सुरू केले. सचोटी आणि प्रामाणिकपणे दर्जेदार गुणवत्ता देत केलेल्या कामामुळे अमराळे डेअरीचे दूध पुणेकरांच्या पसंदीला उतरले. या कामात त्यांनी भावांना, पुतण्यांना स्थिरस्थावर केले. सर्व भाऊ, पुतणे त्यांनी मांडलेल्या विचारांवर मार्गक्रमण करीत होते. राजकारणात पाऊल टाकल्यापासून त्यांनी शरदचंद्रजी पवार यांच्याशी एकनिष्ठपणे काम केले. पक्षसदस्यत्वापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले. 2007 ते 2012 या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी विजयी झाले. पाच वर्षात केलेल्या कामामुळे त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सदस्य पुरस्कार मिळाला होता. त्याकाळात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून झालेल्या कामामुळे नंतर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. एकत्रित कुटूंबाचा आदर्शही त्यांनी तालुक्याला घालून दिला. सतत हसतमुख, मितभाषी, सयंमी स्वभावाचे असलेले अमराळे तालुक्यात भाऊ नावाने प्रसिद्ध होते. सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. त्यांच्यामागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा: अँटीजेन किट संपल्याने कोरोना चाचण्या थांबल्या