पुण्यात पिरंगुटला चार जनावरांचा मृत्यू; घटसर्पामुळे दगावल्याची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

पिरंगुट (ता. मुळशी) येथील घटसर्पसदृश्य आजाराने चार जनावरे दगावल्याची घटना घडली असून संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथे चार जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मरण पावलेल्यांमध्ये दोन म्हशी, एक रेडा व एका पारडीचा समावेश असून उर्वरित चार जनावरे वाचविण्यात पशूसंवर्धन विभागाच्या पथकाला यश आले आहे. 

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

सोमवारी सकाळी पुणे येथील पशूसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी व निदानासाठी प्रयोगशाळेत पाठविलेले आहे. आज त्याचा अहवाल येणार आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सर्वच जनावरांना घटसर्पाचे लसीकरण करण्यास पशूसंवर्धन विभागाने सुरवात केली असून दुपारपर्यंत दोनशेच्या आसपास जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. 

लिंगाण्यावर फडकला 30 फुटी भगवा व्हिडिओ होतोय व्हायरल

पिरंगुट येथील सावकारवाडीतील पशूपालक शेतकरी दत्तात्रेय एकनाथ गोळे यांच्याकडे सध्या एकूण बारा जनावरे आहेत. त्यातील आठ जनावरांना  गेल्या शुक्रवारपासून आजारीची लक्षणे सुरू झाली. त्यात चार जनावरे गेल्या सलग तीन दिवसांत घटसर्पसदृश्य आजाराने मरण पावली आहेत. शुक्रवारी सकाळी गोळे यांच्या एका गाभण म्हशीला या आजाराची लक्षणे दिसू लागली होती. संध्याकाळी ही म्हैस मरण पावली. त्यानंतर त्यांनी तातडीने शासकीय पशूसंवर्धन अधिकाऱ्यांना व डॅाक्टरांना संपर्क करून माहिती दिली. शनिवारी काही डॅाक्टरांनी येऊन उपचाराला सुरवातही केली परंतु त्याच दिवशी म्हणजे शनिवारीही एक दुभती म्हैस व एक रेडा या आजाराने मरण पावला. त्यानंतर रविवारी एक पारडू मरण पावले.

सोमवारी सकाळी पशूसंवर्धन विभागाचे पुणे येथील पथक पिरंगुटला दाखल झाले आणि उर्वरित चार जनावरांवर उपचार सुरू केले. त्यामुळे या चार जनावरांना वाचविण्यात यश आले. जिल्हास्तरावरील डाॅ. मुगळीकर, डाॅ.  खंडाळे, डाॅ. काळे तसेच पिरंगुट येथील पशूसंवर्धन अधिकारी डाॅ. अशोक गाढवे यांनी तातडीने उर्वरित जनावरांवर उपचार सुरू केले. या पथकाने मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्याचा नमुने तपासणीसाठी व रोगनिदानासाठी पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविले. उद्या त्याचा अहवाल येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लसीकरणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे....याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते म्हणाले, "पिरंगुट येथील मृत जनावरांचे शवविच्छदनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविलेले आहेत. मंगळवारी अहवाल आल्यानंतर उपचाराची दिशा ठरविली जाईल. मात्र , शेतकऱ्यांनी लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांना लसीकरणाबाबत उदासिनता दिसून येते. आजार आल्यानंतरच लसीकरणाला शेतकरी प्राधान्य देतात ही बाब चुकीची असून आजार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आजार होण्यापूर्वीच जनावरांना लसीकरण करून घेतले पाहिजे.

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four animals died in pirangut

Tags
टॉपिकस
Topic Tags: