अजितदादांची हवीहवीशी दादागिरी...सोमेश्वर कारखान्याची एफआरपी राज्यात पहिली

संतोष शेंडकर
Monday, 22 June 2020

राज्यात अजूनही चालू हंगामाची दहा टक्के एफआरपी थकीत आहे. एफआऱपीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेणारा सोमेश्वर पहिलाच कारखाना आहे. सोमेश्वरचा दर त्यामुळे 2900 रूपये प्रतिटनावर गेला आहे.

सोमेश्वरनगर (पुणे) : सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन 2019-20 च्या गाळप हंगामात गळीत झालेल्या उसाच्या दुसऱ्या बिलापोटी प्रतिटन शंभर रूपयांप्रमाणे रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्याचा आजपर्यंतचा भाव 2900 रूपये प्रतिटनावर जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिली. या निर्णयामुळे एफआऱपीपेक्षा वाढीव दर देणारा सोमेश्वर हा जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.

जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

सोमेश्वर कारखान्याने सन 2019-20 च्या हंगामात 9 लाख 34 हजार टन इतके जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे गाळप केले. साखर उताराही 11.86 टक्के इतका जिल्ह्यात सर्वाधिक मिळविला. यातून 11 लाख 8 हजार 950 क्विंटल साखर तयार झाली. या उसाच्या पहिल्या बिलापोटी कारखान्याने सभासदांना प्रतिटन 2800 रूपये इतकी एफआरपी (रास्त दर) एकरकमी सभासदांच्या खात्यावर जमा केली होती. 

 पुण्यातील दोन खासदार टाॅप फाईव्ह परफाॅर्मर 

सोमेश्वर कारखान्याने 1 जुलैपासून सभासदांना ऊस लागवडीसाठी परवानगी दिली आहे. सभासदांना शक्यतो दरवर्षी मशागत, खते, लागवड यासाठी काही ना काही रक्कम देण्याची कारखान्याची परंपरा आहे. या वर्षी लाॅक डाउनमुळे साखरविक्री ठप्प होती. परिणामी बिल रक्कम मिळणार नाही, अशीच अटकळ होती. परंतु, संचालक मंडळाने बैठकीत प्रतिटन शंभर रूपयांप्रमाणे बेसल डोससाठी प्रोत्साहन रक्कम म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्याला 9 कोटी 34 लाख रूपयांची तरतूद करावी लागणार आहे.

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

दरम्यान, राज्यात अजूनही चालू हंगामाची दहा टक्के एफआरपी थकीत आहे. एफआऱपीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेणारा सोमेश्वर पहिलाच कारखाना आहे. सोमेश्वरचा दर त्यामुळे 2900 रूपये प्रतिटनावर गेला आहे. याशिवाय सप्टेंबरअखेर हिशेबपत्रके तयार झाल्यावर अंतिम दरही जाहीर केला जाणार आहे. अन्य कारखान्यांच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढणार आहेत.

खरिप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी

कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, मागील तीन महिने ठप्प झालेल्या साखर उद्योगात हालचाल सुरू झाली असून साखरनिर्यातही पुन्हा सुरू झाली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. तसेच, कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 9 कोटी 35 लाख युनिट वीजनिर्मिती केली असून, त्यापैकी 6 कोटी 34 लाख युनिटची विक्री केली आहे. अल्कोहोलनिर्मितीतही जिल्ह्यात आघाडी घेत 82 लाख 86 हजार लिटर निर्मिती केली.
 - पुरुषोत्तम जगताप,
अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FRP of Someshwar Sugar Factory is first in the state