कोरोना रुग्णांच्या पार्थिवास महिला तहसीलदारांकडून मुखाग्नी...

डाॅ. संदेश शहा
Friday, 31 July 2020

भिगवणच्या रुग्णाचा काल रात्री, तर माळवाडी येथील रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी ही माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली. मात्र, त्यांनी मृतदेह आपल्या गावी नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 84 वर्षाचे जेष्ठ नागरिक व माळवाडी नंबर 2 राऊतवस्ती येथील 65 वर्षाच्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवास तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मुखाग्नी दिला. इंदापूर नगरपरिषद, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक गफूरभाई सय्यद, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने अंत्यविधी पार पाडण्यासाठी मदत केली.  

वीजग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात ३० जुलै रोजी सकाळी भिगवण, तर दुपारी माळवाडी राऊतवस्ती येथील कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना भिगवणच्या रुग्णाचा काल रात्री, तर माळवाडी येथील रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी ही माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली. मात्र, त्यांनी मृतदेह आपल्या गावी नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तहसीलदार मेटकरी यांनी इंदापूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. 

पुण्यात शिवसेनेला बळ मिळणार

त्यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संघटक तथा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे संस्थापक सचिव गफूरभाई सय्यद यांच्याशी संपर्क साधला. इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून पार्थिव वैकुंठ स्मशान भूमीत आणले. काल रात्री भिगवणच्या, तर आज सकाळी माळवाडी येथील कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, प्रा. कृष्णा ताटे, अमोल खराडे, आकाश गावडे, सुरज मिसाळ, अजय रजपूत, अजिंक्य ताटे यांनी विधी पार पाडण्यास मदत केली. या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral of Corona patient by Tehsildar of Indapur