

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : ‘गणपती बाप्पा मोरया!’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटाने शहरांमधील मैदाने घुमू लागली आहेत. गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी असले, तरी या पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा पथकांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाईमध्ये इतकी क्रेझ आणि चुरस दिसली की, ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच जागा फुल्ल होऊन शेकडो तरुण-तरुणींना ‘वेटिंग लिस्ट’वर राहावे लागले.
शहरातील विविध मैदानांवर, उड्डाणपुलाखाली आणि नदीपात्रात सायंकाळच्या वेळी ढोल-ताशांचा गजर ऐकायला मिळत आहे. यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वच पथकांनी कंबर कसली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि सांगवी परिसरात सायंकाळच्या वेळी ढोल-ताशांचा कडकडाट ऐकायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सराव सुरू आहे. पथकांमध्ये केवळ तरुण-तरुणीच नव्हे, तर लहान मुले आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
पाच मिनिटांत जागा फुल्ल!
पूर्वी पथकात सहभागी होण्यासाठी ओळख किंवा थेट मैदानात जावे लागायचे. आता डिजिटल पद्धतीने नावनोंदणी होते. एका नामांकित पथकाच्या प्रमुखांनी सांगितले, ‘आम्ही रविवारी सकाळी दहा वाजता नावनोंदणीचा गुगल फॉर्म सोशल मीडियावर लाईव्ह केला. १० वाजून ५ मिनिटांनी आम्हाला फॉर्म बंद करावा लागला, कारण आमच्याकडील ५०० वादकांची क्षमता पहिल्या ५ मिनिटांतच संपली होती.’
पारंपरिक तालांचा सराव
मिरवणुकीत आपली सर्वोत्तम कला सादर करण्यासाठी वादक सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या तालांचा, जसे की ‘मोरया’, ‘नाद’, ‘पुणेरी’ आणि ‘शिवगर्जना’ अशा पारंपरिक आणि नव्या आवर्तनांचा सराव केला जात आहे. ढोल-ताशांच्या तालावर ‘आवाजाचा थरार’ आणि ‘पारंपरिक संस्कृती’ यांचा सुरेख संगम साधण्यासाठी वादक तासन्तास घाम गाळत आहेत.
मुली ५० टक्क्यांवर!
काही वर्षांपासून सरावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पथकांमध्ये मुलींचा वाढलेला टक्का. वजनदार ढोल कंबरेला बांधून तासन्तास उभं राहून वाजवण्याची ताकद आणि जिद्द मुली मोठ्या प्रमाणावर दाखवत आहेत. अनेक पथकांमध्ये आता ५० टक्के वादक या मुली आणि महिला आहेत.
तरुणाईचा वाढता सहभाग
शहरातील आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्रातील नोकरदार वर्ग, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि शालेय मुले सरावासाठी रोज मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. नोकरी आणि शिक्षणाचा सांभाळ करत ही तरुणाई आपली संस्कृती जपण्यासाठी तासन्तास सराव करत आहे. पथकांमध्ये महिला वादकांची आणि ध्वजधारकांची संख्याही लक्षणीय आहे.
---
आमचे ढोल-ताशा पथक गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. या पथकामध्ये २०० ते २५० वादक आणि सदस्यांचा समावेश आहे. केवळ वादन न करता हे पथक अनाथ आश्रमांमध्ये आणि वृद्धाश्रमांमध्ये अन्नदान करते. हे पथक केवळ सण-उत्सवांमध्ये ढोल-ताशा वाजवण्यापुरते मर्यादित नसून, सामाजिक भान जपून समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचे मोठे कार्य करत आहे.
- आशिष पाटील, वादक, शिवछत्रपती ढोल-ताशा पथक
आमच्या ढोल-ताशा पथकामध्ये ३० मुली आणि २० मुलांची नोंदणी झालेली आहे. दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ असा दोन तास सराव केला जातो. मुली मोठ्या प्रमाणामध्ये ढोल वाजवतात. यंदा ढोल-ताशा पथकाचे सहावे वर्ष आहे.
- तेजस परंडवाल, प्रमुख, माळीनगरचा विघ्नहर्ता ढोल-ताशा पथक
PNE26W44121
PNE26W44122
PNE26W44123
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.