esakal | पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Ganesh_Festival

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांना सजावट (देखावे) सादर करण्यास परवानगी देता येणार नाही. त्यामुळे मंडळांनी 'श्रीं'च्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करून उत्सव साजरा करावा,'' असे आवाहन गुरूवारी (ता.६) पुणे पोलिसांनी गणेश मंडळांना केले. 

वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, "दरवर्षी आपण सर्वजण मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करू या, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढू नये. भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी. त्याच बरोबर गणेश मूर्तीचे विसर्जन मंडळांच्या जवळ आणि घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करावे.'' 

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय; कुणी केला आरोप?​

यावर्षी गणेश मंडळांना देखावे सादर करण्यास परवानगी नसल्याचे सह आयुक्त शिसवे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "राज्यात आणि पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना, यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वजण साध्या पद्धतीने साजरा करूयात. जेणेकरून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखी होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर मी सर्व मंडळांना साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की, आपण यंदाचा गणेशोत्सव मंदिरात साजरा करू. '' 

'जिंदगी मिलके बिताऐंगे'; कलाकारच बनले एकमेकांचे आधार!​

गणेश मंडळांची आर्थिक मदतीची मागणी 
कोरोनामुळे सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. आमचे वर्गणीदार हे व्यापारी असल्याने त्यांच्याकडे देखील पैसे नाहीत. यामुळे सर्व मंडळे आर्थिकदृष्टया मोठ्या संकटात आहे. त्यामुळे महापालिकेने दहा बाय दहा फूट आकाराच्या मंडपाचा खर्च उचलावा. तसेच प्रत्येक मंडळांना महापालिकेने एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top