esakal | गणेशोत्सव साधेपणाने; पण उत्साह कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav

गणेशोत्सव साधेपणाने; पण उत्साह कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर काही सोसायट्यांनी (Society) सावध पवित्रा घेत यंदाचा गणेशोत्सव साजरा (Ganeshotsav Celebration) न करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. आरतीच्या वेळी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी काही सोसायट्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा रद्द केल्या आहेत, तर काहींनी ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या वर्षी सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असला, तरी उत्साह जल्लोष आणि भक्तिभाव कायम असल्याचे दिसून आले.

कोथरूड परिसरात वातावरण भक्तिमय

कोथरूड : कोथरूडमधील बहुतांश सोसायट्यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळत, कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यात सोसायटीतील भक्तिमय वातावरण कायम राहील, याचीही पुरेपूर दक्षता सभासदांनी घेतली आहे. कोरोनाच्या सावटातही सुखाचे क्षण परत आणायचे या भावनेतून बच्चे मंडळींनी सोहळ्याचा आनंद टिकवून ठेवलेला दिसत आहे.

किरण पाटील, इंद्रायणी सोसायटी : यंदा आम्ही ज्येष्ठ मंडळी शांत असलो तरी मुलांनी नियमांचे पालन करत, उत्साहात गणेशोत्सव करण्याचे ठरवले आहे. ॲड. उदय रबडे, अध्यक्ष, आयडियल पार्क सोसायटी : सोसायटीत मुलांनी कार्यक्रम टाळत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

रूपाली हुडेकर, हिमाली सोसायटी : कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत आहोत. मनोरंजनाचे कार्यक्रम, मिरवणूक रद्द केली आहे. रोजची आरती दहा जणांच्या उपस्थितीत करतो. वर्षाच्या सुरवातीलाच सभासदांकडून आम्ही उत्सव निधी घेत असतो. त्याचे वेगळे बँक खाते काढले जाते. त्यातून वर्षभरातील उत्सव, कामगारांचा बोनस यावर खर्च करतो. गतवर्षी कोरोनामुळे फारसे सण साजरे करता आले नाहीत. निधी उरला असल्यामुळे यंदा आम्ही वर्गणी कमी घेतली. कामगारांना दिवाळी बोनस, मिठाई देणार आहोत. सोसायटीतील कामगारांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मोफत दिले आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या सावटातही आल्या आल्या सोनपावलांनी गौराई

पर्यावरणपूरक आणि ऑनलाइनवर भर

सिंहगड रस्ता : सोसायट्यांनी पर्यावरणपूरक आणि ऑनलाइन गणेशोत्सवावर भर दिला आहे. वडगाव बुद्रूक येथील प्रयेजा पूरम सोसायटीत पर्यावरणपूरक आरास करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी ऑनलाइन चित्रकला आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहे. याशिवाय मुलांची नृत्य स्पर्धाही ऑनलाइनच होणार असल्याची माहिती सोसायटीच्या सदस्यांनी दिली.

वडगाव धबाडी येथील डेझी डॅफोडिल्स सोसायटीत बांबू, कापूस यासह इतर वस्तूंचा वापर करून आरास करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत, असे अध्यक्ष संदीप शितोळे यांनी सांगितले. वडगाव येथील चरवडवाडी निवृत्ती नगर येथे प्रथमेश पाटील आणि रचना गवळी या युवकांनी आठ बाय दहा फूट आकारात लालबागचा राजा रांगोळीतून साकारला आहे. यासाठी त्यांना ८० तासांचा कालावधी लागला, तर दहा किलो रांगोळी लागली. रांगोळीसाठी जवळपास एक महिना आधीपासून तयारी केली होती. दत्तवाडी, हिंगणे, आनंदनगर आणि माणिकबाग भागातही नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. मंडळांनी मोठे कार्यक्रम आयोजित न करता सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे.

खराडी, विमाननगरमध्ये उत्सव साधेपणाने

वडगाव शेरी : विमाननगर, खराडी, कल्याणीनगर, परिसरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोसायट्यांनी क्लब हाउसमध्ये साधेपणाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे सोसायट्यांनी या वेळेस सभासदांकडून उत्सवासाठी वर्गणी गोळा केलेली नाही. रहिवाशांना गणेशोत्सवाचा आनंद मिळावा, यासाठी ऑनलाइन स्पर्धा आणि आरतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आरतीच्या वेळी गर्दी न होता प्रत्येक कुटुंब घरातूनच ऑनलाइन आरतीत सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहे.

किरण पलसे, रहिवासी, मार्बल सिराईस सोसायटी, खराडी : आम्ही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहोत. सोसायटीतील रहिवाशांसाठी ऑनलाइन स्पर्धा होणार आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे. श्यामराव आढाव, अध्यक्ष, कोणार्क कॅम्पस सोसायटी, विमाननगर : सोसायटीतील रहिवाशांना ऑनलाइन आरती आणि ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सभासदांकडून वर्गणी गोळा केलेली नाही.

हेही वाचा: विसर्जनाचे दिवस ४; फिरत्या हौदांसाठी खर्च ११ दिवसांचा !

बाणेर, बालेवाडीत गणेशोत्सवावर मर्यादा

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी भागातील सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे या सगळ्यांवरच मर्यादा आलेल्या आहेत.

विकास कामत, अध्यक्ष, कम्फर्ट झोन सोसायटी : दरवर्षी सोसायटीमध्ये गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वसुधा हिरे, रहिवासी, प्रकृती सोसायटी : सोसायटीत दरवर्षी दहा दिवसांचे गणपती असतात. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे या वर्षी फक्त दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गौतम गोंदील, सचिव, सुप्रिम पाम्स : अगदी साध्या पद्धतीने लहान मुलांनीच गणपतीची आरास केली. सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरे करत आहोत. आरतीच्या वेळी सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर केला जात आहे.

डिसेंबरपर्यंत कोणतेही कार्यक्रम नाहीत

बाणेरे परिसरातील रेजन्सी कॉसमॉस सोसायटीमध्ये कोरोनामुळे डिसेंबरपर्यंत कोणतेही कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सोसायटीच्या सांस्कृतिक विभागाच्या सदस्या वैशाली तांबे यांनी दिली. बाणेर येथील प्राइम पनाश सोसायटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आरतीसाठी काही ठराविक कुटुंबांतील सदस्य येतात. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आरती केली जाते अशी माहिती सोसायटीचे सचिव गजानन जन्नावार यांनी दिली.

loading image
go to top