'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

पुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरिता गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, विशेष पोलिस अधिकारी, एनजीओ यांच्या मदतीने जनजागृती व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पुणे : मुंबईतील धारावीच्या धर्तीवर पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सर्वतोपरी मदत पोचविण्याबरोबरच त्यांच्यामध्ये या विषाणूबाबतची जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यातील पानशेत पूरग्रस्त सोसायट्या अन् प्रशासन...​

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला समन्वय अधिकारी राजेंद्र निंबाळकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे विवेक खटावकर, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पुनीत बालन, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, सेवा मित्र मंडळ शिरीष मोहिते आणि स्वामी नारायण मंदिराचे डॉ. पियुष लाठी हे उपस्थित होते. 

'...यामुळे २७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा शिक्षण घेता येणार नाही'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती!​

पुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरिता गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, विशेष पोलिस अधिकारी, एनजीओ यांच्या मदतीने जनजागृती व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याबाबत आग्रह धरणे, सोशल डिस्टसिंग पाळण्याबाबत सूचना देणे, विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे, जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन टेस्ट करणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग मध्ये सहाय्य्य करणे आदी कामांसाठी मदत मंडळांनी करावी. त्याचबरोबर घरी विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे व त्यांना सहाय्य करणे यासाठी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहन या बैठकीत प्रशासनातर्फे करण्यात आले. 

दिवसभर काम केलं तर रात्री दोन घास पोटासाठी मिळतात पण लाॅकडाउनमध्ये मात्र...

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून दिलेल्या रुग्ण वाहिका वापर करून रुग्णांना तपासणीसाठी ने-आण करणे, रुग्णांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्याकरिता मदत करणे, झोपडपट्टी क्षेत्रातील सार्वजनिक स्वछतागृहे यांची स्वछता यावर लक्ष देणे, लॉकडाऊनच्या कालावधीत गरजू नागरिकांना विषेत: बेघर, विद्यार्थी यांची भोजनाची व्यवस्था करणे. या स्वरूपाचे कामे लोकसहभागातून करण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलविण्यात आली असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी महेश सूर्यवंशी यांनी "कोरोनाच्या आपत्कालीन काळात शहरातील सर्व गणेश मंडळ प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत." तर रासने यांनी "शहरात रुग्णांना विविध रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना होणेकरिता डॅशबोर्ड पाहता यावा, यासाठीची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी.'' यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकरिता त्यांचेकडून अपेक्षित कामाची पुस्तिका तयार करून पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Mandals and NGOs will be enlisted to help prevent the spread of corona in Pune