'...यामुळे २७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा शिक्षण घेता येणार नाही'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

राज्यात विविध विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण 38 हजार 108 विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे उच्च शिक्षण आणि या स्थितीचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम काय झाला, हे तपासण्यासाठी दोन जून ते 30 जून या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले.

पुणे : राज्यात कोरानामुळे लॉकडाऊन असला, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच उच्च शिक्षण घेणार्‍या बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण योग्य असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. यातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे 27 टक्के विद्यार्थ्यांना आर्थिक स्थितीमुळे या वर्षीचे शिक्षण घेता येणार नाही, अशी भीती देखील वाटते आहे.

पुणे विद्यापीठात गैरव्यवहार? आदेश झुगारत 'ते' पैसे वाटलेच कसे?

राज्यात विविध विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण 38 हजार 108 विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे उच्च शिक्षण आणि या स्थितीचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम काय झाला, हे तपासण्यासाठी दोन जून ते 30 जून या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. आयआयटी मुंबईतील प्रा. बी. एन. जगताप आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आनंद मापुस्कर यांनी हे सर्वेक्षण केले आहे. कृषी आणि अकृषी तसेच तंत्रज्ञान विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले आहे. गुगल फॉर्मद्वारे प्रश्‍नावली देऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.

बदलत्या हवामानाच्या अंदाजासाठी 'एनडब्ल्यूपी' प्रणाली ठरतेय उपयुक्त; काय आहे एनडब्ल्यूपी?​

सर्वेक्षणातील निरीक्षणात या वर्षी आर्थिक संकटाची चिंता विद्यार्थ्यांना आहे. सुमारे 82 टक्के विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणावर खर्च करणे कठीण होईल, असे वाटते. तर 27 टक्के विद्यार्थी 2020-21 या वर्षात शिक्षण सुरू ठेवण्याची शक्यता धूसर असल्याचे मत व्यक्त करतात. तसेच 73 टक्के विद्यार्थ्यांना या काळात आपल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करावे वाटत आहे. त्यासाठी अर्धवेळ नोकरी, कमवा आणि शिका योजनेत सहभाग, शेती यासारखे पर्यायांचा विचार ते करतात.

दिवसभर काम केलं तर रात्री दोन घास पोटासाठी मिळतात पण लाॅकडाउनमध्ये मात्र...

ऑनलाइन शिक्षणाच्या स्थितीवरही या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेणार्‍या राज्यातील 91 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, 32 टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, संगणक आहे, तर केवळ सहा टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी कोणतेच उपकरण नाही. एकूण 79 टक्के विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात आहे. लॉकडाऊनच्या काळात 66 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणही घेतले आहे. सुमारे 33 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सोपे आणि सोयीचे वाटते, तर 26 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयातील शिक्षणाला कौल दिला आहे. अन्य 33 टक्के विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनासह ऑनलाइन शिक्षण योग्य असल्याचे सांगतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरानाचा प्रादुर्भाव पाहता अनेकांनी या वर्षी शैक्षणिक वर्ष सहा महिन्यांनी वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुमारे 32 टक्के विद्यार्थ्यांना मुदतवाढ हवी, तर 26 टक्के विद्यार्थ्यांनी त्या विरोधात मत नोंदविले आहे. महाविद्यालये सुरू करायची असल्यास मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा करावा, असे 32 टक्के विद्यार्थ्यांना वाटते, 26 टक्के विद्यार्थ्यांना ही जबाबदारी विद्यार्थ्यांची वाटते, तर या मुद्द्यावर 42 टक्के विद्यार्थी तटस्थ आहेत. कोविडची स्थिती पाहता आपली पदवी चांगली नोकरी देऊ शकेल, असे 37 टक्के विद्यार्थ्यांना वाटते, तर 17 टक्के विद्यार्थ्यांनी यावर नकारात्मक मत व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A survey was conducted to find out what effect the corona and lockdown had on the students ’psyche