तुमच्या पिढ्या वाढताहेत ते ठीक, पण जमीनचं काय?

Landlord-Farmer
Landlord-Farmer

पुणे : काय सांगू बाबा, जसं जसं दिस जातील. तसं तसं काळजाचा टुकडा असलेल्या जमिनीचं बारिक बारिक टुकडं (तुकडे) व्हयालेत. पणजा, आज्जा, बाप, नातू, पणतू अशा एक एक पिढ्या वाढायल्यात. जशा पिढ्या वाढायल्यात, तसं कुटूंबागणिक जमीन कमी व्हयालीय. यामुळं मोठा जमीनदार म्हणून किर्ती असलेल्या आजोबांचा नातू गरीब शेतकरी बनू लागलाय. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील एका कुटुंबातील ८० वर्षीय आज्जी सांगत होत्या. 

आमच्या काळात जमीन म्हणजी काळजाचा तुकडा. पण पैशाच्या हवाशापायी नव्या पिढीतील लोकांना याची किंमतच कळंना. त्यामुळंच तर या काळजाच्या  तुकडा ईकायसाठी कुणी कसलाच विचारबी करित नाय. या  तुकड्यासाठी आज्ज्याने किती कष्ट उपसलं, याचीबी किंमत यांना कळंना. हे ईकणारे आमचेच नातू-पणतू. पण हे सगळे आयत्या बिळात नागूबा हाईत, असंही या आज्जी सांगत होत्या. 

आमच्या पिढीत आम्हाला ईस एकर जमीन हुती. आता तीच आमच्या नातवांकडे एक ते दीड एकर हाय. कारणबी तसंच हाय. आम्हाला चार पोरं. या पोरांना पाच-पाच एकर वाटून मिळाली. आमच्या पोरांपैकी एकाला दोन, एकाला तीन एकाला चार पोरं. दोन पोरांवाल्यानं दोघांना अडीच- अडीच, तीन पोरावाल्यानं तिघांना कमी-जास्त परतेकाला पावणे दोन एकर तर, चार पोरावाल्यानं परतेकाला सव्वा-सव्वा एकर जमीन वाटून दिली. हे माझ्या डोळ्यांदेखत घडलं. 

हे सगळं विभक्त कुटुंबपद्धती मुळे घडले, हे ठीक आहे, पण त्याच जोडीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले. यामुळे शहरालगतच्या हवेली, मुळशी, खेड, शिरुर आणि पुरंदर या तालुक्यातील अनेक कुटुंबांनी तर संपूर्ण शेतीच विकून टाकली. यामुळे कित्येकांवर भूमीहीन होण्याची वेळ आली आहे, असं या तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

ही झाली काही प्रातिनिधीक उदाहरणे. यात तथ्य आहे. पण जिल्ह्यात सर्वत्र अशीच स्थिती पाहायला मिळत असल्याचे या तालुक्यातील तलाठ्यांकडून सांगण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील जमिन धारण क्षेत्रात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. याबाबतचा कारणांचा शोध घेण्यासाठी 'सकाळ'च्यावतीने विभक्त कुटुंबातील वयस्कर व्यक्ती, तरूण पिढीतील तरूणवर्ग, कृषी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. मात्र या सर्वांनी नाव न. छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यातील ५८ टक्के शेतकऱ्यांकडे जमीन धारणेचे क्षेत्र एक हेक्टरच्या आत आहे. हे एकुण ४ लाख ८५ हजार शेतकरी आहेत. हे  सर्व शेतकरी अत्यल्प भूधारक झाले आहेत. याव्यतिरिक्त दोन हेक्टरच्या आत जमीन असलेले १ लाख ८९ हजार म्हणजेच २३ टक्के शेतकरी आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांपैकी ८१ टक्के म्हणजेच ६ लाख ७४ हजार शेतकरी हे अत्यल्प व अल्प भूधारक आहेत.

क्षेत्र घटीची प्रमुख कारणे :

- विभक्त कुटुंबपद्धतीत झालेली वाढ.

- जिल्ह्यातील  वाढते औद्यौगिकीकरण.

- विविध प्रकल्पांसाठी झालेले भूसंपादन.

- शेती परवडत नसल्याची धारणा होऊन विक्रीत झालेली वाढ. 

- चंगळवाद वाढल्याने कारण नसतानाही फक्त पैशाच्या हव्यासापोटी जमिन विक्री करणे. 

- शहरालगतच्या गावांमधील शेतीत गृहप्रकल्पांची झालेली वाढ. 

क्षेत्र घटीची सुरूवात :

- नव्वदच्या दशकापासून सुरूवात. 

- मागील २५ वर्षांपासून सातत्याने घट. 

- गेल्या पाच वर्षांपासून  दरवर्षी सरासरी तीन टक्के घट.

-  मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही पुन्हा तीन  टक्के घट कायम.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जमीन धारणा क्षेत्रनिहाय शेतकरी संख्या (कंसात टक्केवारी)  
-  पुणे जिल्ह्यातील एकूण शेतकरी - ८ लाख २७ हजार.

-अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पेक्षाही कमी क्षेत्र धारण करणारे) - ४ लाख ८५ हजार (५८%).

- अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर दरम्यान क्षेत्र धारण करणारे) - १ लाख ८९ हजार (२३%).

- अत्यल्प आणि अल्प भूधारक मिळून एकूण शेतकरी - ६ लाख ७४ हजार. (८१%).

- दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारणा क्षेत्र असलेले शेतकरी - १ लाख ५४ हजार (१९%). 

कृषी गणनेनुसार  सरासरी जमीन धारणा क्षेत्र ((मागील २५ वर्षाचे) 

१) १९९१ ---- २.२६ हेक्टर.
२) १९९६  ---- १.९ हेक्टर.
३) २००१  ---  १.५६ हेक्टर.
४) २००५  ---- १.४५ हेक्टर.
५) २०१० ---- १.३६ हेक्टर.
६) २०१५ ---- १.२७ हेक्टर.
७) २०२० ---- गणना होणे बाकी.

(टीप :- ही कृषी गणना दर पाच वर्षांनी केली जाते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com