घरातील लहानग्यांना घेऊन चुलता- पुतण्या गेले पोहायला... 

चंद्रकांत घोडेकर
गुरुवार, 21 मे 2020

कोलदरे येथील रहिवासी व मुंबईतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आलेले उल्हास हिरामण काळे (वय 42) व रोहन राजेंद्र काळे (वय 18) यांचा घोड नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला.

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील कोलदरे येथील रहिवासी व मुंबईतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आलेले उल्हास हिरामण काळे (वय 42) व रोहन राजेंद्र काळे (वय 18) यांचा घोड नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. या चुलता व पुतण्याच्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

यूपीला निघालेलं जोडपं म्हणतंय, "हालात सामान्य हुए तो लौटेंगे...'  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहन याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्पेअर पार्टचा व्यवसाय होता. आज दुपारी एकच्या सुमारास घोड नदीवर म्हसोबाचा डोह येथे पोहण्यासाठी ते गेले होते. त्यांच्याबरोबर इतर तीन लहान मुले होती. उल्हास व रोहन काळे हे पोहण्यासाठी नदीत उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. 

उद्धव ठाकरे यांना अमोल कोल्हे म्हणाले, "हे काम कराच...' 

या वेळी तीरावर उभ्या असलेल्या त्यांच्या घरातील इतर तीन मुलांनी आरडाओरडा केला. तसेच, घरी मोबाईलवरून सांगितले. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात गावातून लोक आले. त्यांनी दोघांनाही खासगी गाडीतून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, वेळ खूप झाला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghodegaoan- Two rowned in a river