esakal | मंचरचे गोडसे निभावताहेत माणुसकीचा धर्म

बोलून बातमी शोधा

machidra godse

मंचरचे गोडसे निभावताहेत माणुसकीचा धर्म

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : एक वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटाला जनता व प्रशासन तोंड देत आहे. दरम्यानच्या काळात इंजेक्शन, औषधे, ऑक्सिजन, कपडे आदी सर्वच साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. सद्यस्थितीत सरपणाच्या मागणीत चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. पण माणुसकीचा धर्म प्रामाणिकपणे पाळून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सरपणाच्या किंमती स्थिर ठेवण्याचे काम मंचर येथील सरपणाचे पुरवठादार मच्छिंद्र गोडसे (वय ६७) हे करत आहेत. गेली चाळीस वर्ष ते मंचर येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सरपण पूरविण्याचे काम करत आहेत.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

मंचर येथील पाटील वाड्यात असलेल्या थोरात यांच्या लाकडाच्या वखारीत लाकूडतोड म्हणून कामाला सुरवात केली. त्यानंतर मोरडेवाडीत गोडसे यांनी लाकडाची वखार सुरु केली. घरोघरी स्वयंपाकासाठी सरपणाऐवजी गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे गोडसे यांनी स्मशानभूमीला सरपण पुराविण्याच्या कामाकडे अधिक लक्ष केंद्रित केले. कालबाह्य वाळलेली लाकडे खरेदी करून त्याचे लहान तुकडे करण्याचे काम स्वत: गोडसे करतात. कोरोनासाथी पूर्वी आठवड्याला मंचर स्मशानभूमीत चार ते पाच अंत्यविधी होत होते. पण सध्या आठवड्याला 20 ते 25 अंत्यविधी होतात. रात्री अपरात्री अंत्यविधीसाठी सरपण देण्याचे काम गोडसे करत आहेत.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

अखेरचा श्वास थांबल्यानंतर अंत्यविधीसाठी वापरल्या जाणऱ्या सरपणाचा शोध घेण्याचे काम नातेवाईक करतात. अन्य गावातीलही कोरोना बाधितांचे अंत्यविधी मंचरलाच केले जात आहेत. अंत्यविधीसाठी ७ रुपये किलो या बाजारभावाने सरपण दिले जाते. एका अंत्यविधीसाठी किमान 400 ते 500 किलो सरपणाची गरज भासते. काही जण सरपणाबरोबर गोवऱ्या व कारवीचाही वापर करतात. 70 ते 80 कारव्यांची गरज असते. कोरोना पूर्वी जे दर होते तेच विक्रीचे दर आज कायम आहेत. हा व्यवसाय नसून सेवा म्हणून मी काम करतो.-मच्छिंद्र गोडसे, सरपण पुरवठादार मंचर