पुण्यातील गोल्ड जीमला दणका; ग्राहक मंचाने घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

  • सेवेत त्रुटी ठेवली म्हणून ग्राहक मंचाकडून गोल्ड जीमला दंड

पुणे : कराराप्रमाणे सेवा-सुविधा देण्यामध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी, तसेच तक्रारी खर्च म्हणून 15 हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाने गोल्ड जीमला दिला आहे. मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत विष्णू जेएसबी यांनी गोल्ड जीम, कल्याणीनगर विरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. तक्रारदार यांनी गोल्ड जीमबरोबर एक नोव्हेंबर 2018 ते 31 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीसाठी 15 हजार 400 रुपये अदा करून एका वर्षाच्या कालावधीसाठी सुविधा घेण्याचा करार केला. कराराप्रमाणे तक्रारदार यांनी एक जानेवारी 2019 पर्यंत सेवा घेतली. मात्र, त्यानंतर वैद्यकीय व घरगुती कारणांमुळे जीमची सेवा घेता येणार नसल्याची माहिती तक्रारदार त्यांनी जीमला मेलद्वारे कळविली.

मानसी नाईकसोबत पुण्यात छेडछाड

जीमचे सभासदत्व हस्तांतरित करता येऊ शकते असे करारनाम्यात नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे सदस्यत्व भावाला देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर जीमकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी तीन महिन्यांचे शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत करावी, अशी मागणी केली. मात्र, पैसे परत न मिळाल्यामुळे तक्रारदार यांनी ग्राहक मंचात धाव घेत दावा दाखल केला. मंचाने नोटीस पाठविल्यानंतर जीमच्या वतीने मंचामध्ये कोणी हजर न राहिल्याने मंचाने एकतर्फी आदेश दिला. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत 15 हजार रुपये तक्रारदारांना देण्यात यावेत, असे मंचाच्या आदेशात नमूद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Gym fined by Consumer Forum for keeping error in service

टॅग्स