पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे दोन लाख प्रवाशांची ये-जा होती. रेल्वेच्या 180 पेक्षा जास्त गाड्यांची वाहतूक होते.

पुणे : पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना खुशखबर! रेल्वेतून उतरल्यावर आता पीएमपीच्या स्थानकापर्यंत पायी जाण्याची त्यांना गरज राहिलेली नाही. कारण मंगळवारपासून (ता.19) रेल्वे स्थानकाच्या आवारातूनच बसच्या प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पुणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे दोन लाख प्रवाशांची ये-जा होती. रेल्वेच्या 180 पेक्षा जास्त गाड्यांची वाहतूक होते. या
रेल्वे स्थानकातून आता प्रवाशांना कात्रज, स्वारगेट, कोथरूड, वाघोली, निगडी, तळेगाव, आळंदी आदी मार्गांवरील बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे स्टेशनवर बस शोधून प्रवास करण्याची गरज राहणार नाही.

- 'शबरीमला'च्या दानपेटीत 'इतक्या' कोटींचे दान; महसुलात दुपटीने वाढ!

रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशांना स्थानकाच्या आवारातूनच प्रवास करण्यासाठी बसच्या थांब्यांना जागा द्यावी, अशी मागणी पीएमपी प्रशासन बऱ्याच दिवसांपासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे करीत होती.

- फेसबुक, ट्विटरला तगडी टक्कर; ‘डब्लूटी’ सोशल मीडियातला नवा भिडू

पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर आणि वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. गुंडे यांनी त्या बाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर रेल्वेने बस उभ्या करण्यासाठी पीएमपीला रेल्वे स्थानकाच्या आवारात जागा उपलब्ध करून दिली. आवारातील चार क्रमांकाच्या लेनमध्ये बस येतील आणि प्रवासी त्यात बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

- पुणेकरांनो हायअलर्ट राहा; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची बॅनरबाजी

या बाबतची रंगीत तालीम सोमवारी (ता. 18 ) झाली. त्यात सुमारे 100 बसची वाहतूक रेल्वे स्थानकातून करण्यात आली. त्यातून प्रवाशांनी प्रवासही केला. आता सात मार्गांवरील बससेवेला अधिकृतरित्या मंगळवारपासून (ता. 18) प्रारंभ होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for train passengers traveling from Pune railway station