निर्बंध घालावेत, परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये; उद्योजकांची भूमिका

Lockdown
Lockdown

मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती दाखवू नये, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत. सरकारने काही निर्बंध घालावेत; परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोपटलाल ओस्तवाल (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर) - लॉकडाउन मुळीच नको. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदीर, घुशी लागतात. अनेक छोट्या व्यावसायिकांना माल उधार दिलेला असतो. त्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे; पुन्हा लॉकडाउन केले तर संपूर्ण व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; परंतु लॉकडाउन परत नको.

नवीन गोयल (सुका मेवा व्यापारी) - लॉकडाउननंतर हळूहळू सुरू झालेला व्यवहार पुन्हा थांबेल. आधीच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊन व्यापार दोन-तीन वर्षे मागे गेला आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर उधारी बुडेल. मागच्या वर्षीच्या नुकसानीतून अजून बाहेर आलो नाही. शासनाने कडक निर्बंध घालावेत आणि लॉकडाउन टाळावे.

संदीप आगरवाल (तांदळाचे व्यापारी) - कोरोनासोबत आता सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. मात्र गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. 

राजेश शहा (वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) - आधीच व्यापारी, कर्मचारी सगळेच मोठ्या अडचणीत आहेत. लॉकडाउन केले तर आर्थिक नुकसान खूप होणार आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास गेल्या वर्षात झालेले आर्थिक नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. लॉकडाउन करू नये, कारण त्याने कोविड रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही. उलट हातावर पोट असलेल्यांची ढासळलेली स्थिती पूर्ववत आणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न वाया जातील.  

उदय चौधरी (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. पुन्हा लॉकडाउन केले तर व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असेल.

अजित बोरा  (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने आपण काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले. नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे. सरकारने लॉकडाउन न करता गर्दी कशी कमी करता येईल, याकडे पाहावे. नागरिकांनी गांभीर्य ओळखायला हवे. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील. 

ललित जैन (उद्योजक) - आतापर्यंत केवळ ५० टक्के व्यापार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे व्यापा‍री आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार उद्ध्वस्त होईल. लॉकडाउनच्या घोषणेला एक वर्ष झाले आहे. तरीही शहरातील  व्यापाराची घडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे व्यापारी हवालदिल आहेत.

रोहन जाधव (व्यापारी) - पुन्हा लॉकडाउन होणार अशी चर्चा आहे. मात्र, लॉकडाउन केल्यास सामान्यांपासून सर्वांचेच मोठे नुकसान होते. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात.

लॉकडाउनचा परिणाम

  • व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
  • गावी गेलेले अनेक कामगार अद्यापही परत आलेले नाहीत
  • कोट्यवधींची उधारी अडकून पडली आहे.
  • व्यवसाय ५० टक्केच पूर्वपदावर
  • अनेक छोटे व्यवसाय बंद पडले
  • विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com