Pune Grapes news : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes
पुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने

पुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने

नारायणगाव : वाढलेला भांडवली खर्च, निर्यातक्षम द्राक्षाचे(grapes) मिळणारे उत्पन्न याचा विचार करून जानेवारी महिन्यात जम्बो, क्रिमसन, रेड ग्लोब या जातीच्या द्राक्षांची विक्री कमीत कमी प्रतिकिलो ११० रुपये; तर शरद सीडलेस, माणिक चमन, सोनाका, आरके या जातीच्या द्राक्षांची विक्री कमीत कमी प्रतिकिलो ९० रुपये, या दराने करावी, असा निर्णय जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील(junnar and ambegaon) शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

प्रतिकूल हवामान, वाढलेला भांडवली खर्च व काही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. याबाबत चर्चा करून द्राक्ष दराबाबतचे धोरण ठरवण्यासाठी बुधवारी (ता. १२) नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. या वेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक दत्तात्रेय ठिकेकर, संदीप वारुळे, जुन्नर तालुका उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर, बाबाजी नेहरकर, राहुल बनकर, शरद फापाळे, महेंद्र डोके, रोहन पाटे, जितेंद्र भोर, जयसिंग वायकर, शशिकांत थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा: चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज

यावेळी द्राक्ष उत्पादक संजय परदेशी, राहुल शेटे व योगेश तोत्रे म्हणाले, ‘‘पैसे बुडवून काही व्यापारी फरारी होतात. व्यापाऱ्यांना कायद्याचे बंधन असावे, यासाठी सौदे पावती करून त्यावर द्राक्षाचा प्रतिकिलो भाव व पैसे देण्याच्या मुदतीचा उल्लेख असावा. सोबत व्यापाऱ्याचे आधारकार्ड असावे.’’ सचिन वारुळे म्हणाले, ‘‘काही स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत.मुंबई बाजारपेठेत द्राक्ष विक्रीसाठी पाठविल्यास खर्च जास्त लावला जातो.’’ बाबाजी नेहरकर म्हणाले, ‘‘खते, औषधाच्या किमतीत पंचवीस टक्के वाढ झाल्याने भांडवली खर्च वाढला आहे.

भाव निश्चित केल्याने द्राक्षाला योग्य भाव मिळेल.’’ देवदत्त निकम म्हणाले, ‘‘शेतकरी संघटित नसल्यामुळे व काही शेतकरी फितुरी करत असल्याने व्यापारी फसवणूक करत आहेत.’’ राहुल बनकर म्हणाले, ‘‘कंटेनरचे भाडे वाढले आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’ अनिल मेहेर म्हणाले, ‘‘भांडवली खर्च व उत्पादनाचा विचार करून कमीत कमी दर निश्चित केले आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थिती पाहून उत्पादक शेतकरी बाजारभावाबाबत योग्य निर्णय घेऊ शकतो.’’ ठिकेकर म्हणाले, ‘‘सांगली, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी दर निश्चित केले आहेत. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामुळे उत्पादन कमी व भांडवली खर्च जास्त होत आहे. त्यामुळे येथील द्राक्षाला जास्तीचा भाव आवश्यक आहे.’’

हेही वाचा: चीनच्या कुरापतीनंतर भारताने 'अरुणाचल' मधील सुरक्षा वाढवली

जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाच्या(Junnar Taluka Grape Growers Association) वतीने सौदा पावती नमुना तयार केला जाईल. निश्चित केलेल्या कमीत कमी भावाबाबत चर्चा करण्यासाठी व अडचणी समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. १८) व्यापाऱ्यांसोबत(traders) बैठक घेण्यात येईल. या पूर्वी पैसे बुडविलेल्या व्यापाऱ्यांना काळ्या यादीत टाकू.

- जितेंद्र बिडवई,

अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top