लॉकडाउनची भीती, परतीच्या पावसाची धास्ती अन्...

राजकुमार थोरात
Sunday, 30 August 2020

द्राक्षाचा हंगाम दीड महिना उशिरा; शेतकऱ्यांनी पुढे ढकलली बागांची छाटणी

वालचंदनगर (पुणे)  : लॉकडाउनची भीती, परतीच्या पावसाची धास्ती व परप्रांतीय मजुरांच्या टंचाईमुळे चालू वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची छाटणी पुढे ढकलली आहे. द्राक्षाचा हंगाम दीड महिना उशिरा सुरू होणार आहे. 

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, शेळगाव परिसर द्राक्ष बागांचे आगार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्ष ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटी व्रिकीसाठी बाजारात येतात. या द्राक्षांना 100 ते 150 रुपये प्रतिकिलो दर मिळत असून बहुतांश द्राक्षे निर्यात होतात. यामुळे अनेक शेतकरी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बागांची छाटणी करतात. मात्र, गतवर्षी परतीच्या व उशिरा आलेल्या पावसामुळे लवकर छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाची धास्ती आत्तापासून घेतली आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

सध्या भारतासह जगामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटी तयार होणाऱ्या द्राक्षाला खात्रीशीर बाजारपेठ मिळेल की नाही याची खात्री नसून द्राक्षे निर्यात होण्याचा भरवसा नसल्यामुळे जुलै व ऑगस्ट महिन्यातील छाटणी टाळली आहे. इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बहुतांश शेतकरी परप्रांतीय मजुरांकडून द्राक्ष शेती करून घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउनमध्ये गावी गेलेली परप्रांतीय मजूर अद्याप परतले नसून त्यांना येण्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध होण्यास अडचणी आल्या आहेत. 
 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गतवर्षी परतीच्या पावसाने द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले. 125 रुपये किलो दराची द्राक्षे कवडीमोल दराने विकावी लागली. चालू वर्षी परतीचा पाऊस जास्त होण्याचा अंदाज असल्याने तसेच कोरोनामुळे खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध नसल्याचे द्राक्षाची छाटणी पुढे ढकलली आहे. 
- मोहन दुधाळ, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर 
 

 

यासंदर्भात बोरी येथील शेतकरी व कृष्णाई ऍग्रो एजन्सीचे मालक प्रदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गतवर्षी पश्‍चिम भागतील सुमारे 25 टक्के शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या अखेरीस बागांची छाटणी केली होती. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप छाटणी टाळली असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून छाटणीस सुरवात होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The grapes season will start a month and a half late