दुष्काळी टाकेवाडीत इच्छाशक्तीने बहरली समृद्धीची हिरवाई

टाकेवाडी (ता. आंबेगाव) : पाण्याने भरलेला म्हसोबा पाझर तलाव.
टाकेवाडी (ता. आंबेगाव) : पाण्याने भरलेला म्हसोबा पाझर तलाव.

महाळुंगे पडवळ - एकेकाळी दुष्काळी म्हणून टाकेवाडी (ता. आंबेगाव) गावाची ओळख होती. येथील वायाळमळा व शिंदेवाडी येथील शेतजमीन नोव्हेंबर-डिसेंबरनंतर ओसाड पडीक पडत होती. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीद्वारे पाच किलोमीटर अंतरावरून उपसा जलसिंचन योजना राबविली. त्यातून संपूर्ण गाव पाणीदार झाले आहे. गावाचा चेहरामोहरा बदलला असून, सर्वत्र हिरवीगार शेती पाहावयास मिळत आहे. त्यातून नागरिकांचा आर्थिकस्तर उंचाविण्यात मदत झाली आहे.

कळंब-महाळुंगे पडवळ रस्त्यालगत तीन किलोमीटर अंतरावर डोंगर कुशीत वसलेले आंबेगाव तालुक्‍यातील टाकेवाडी हे छोटेसे गाव आहे. येथे दिवाळीनंतर पाणीटंचाईची समस्या नित्याचीच असायची. पाण्याअभावी येथील शेती पडीक राहत होती. पिण्याचे व शेतीचे पाणी मिळाले तर सर्वांचे हित आहे, या भावनेने गावातील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता शिवाजी शिंदे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण वायाळ, माजी सरपंच मारुती वायाळ, वसंत वायाळ, भरत वायाळ, रामदास चिखले आदी ४० शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले. वस्तीवर एक ते दोन बैठका घेऊन तेथील नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टिक्षेपात योजना

  • पाच किलोमीटर अंतरावरून राबविली उपसा जलसिंचन योजना
  • योजनेच्या खर्चासाठी प्रतिगुंठा २५० रुपये लोकवर्गणी 
  • डिंभे डावा कालव्यातून पाणी उचलून ओढ्यात सोडले. 
  • कालव्यातून उचललेल्या पाण्यातून सहा छोटे बंधारे व पाझर तलाव भरला. 
  • योजनेच्या देखभालीसाठी प्रतिगुंठा २५० रुपये लोकवर्गणी

दुष्काळी असलेल्या गावाचे नंदनवन होऊन सर्वत्र हिरवेगार झाले. येथील शेतकरी आता बाराही महिने शेतातून उत्पन्न काढत आहे. या गावात ऊस, कांदा व नगदी पैसे मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी सुरुवात झाली आहे. गाव आता पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे.
- संदीप शिंदे, सरपंच

पाणीटंचाई येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली होती. पाणीटंचाईमुळे पावसाळ्यातच फक्त शेती फुललेली असायची. लोकसहभागातून पाणी योजना राबविल्यामुळे शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले. योजनेसाठी ४० रुपये गुंठा याप्रमाणे वार्षिक पैसे शेतकरी देतात. त्यातून विजेचे बिल, दुरुस्ती व अन्य खर्च भागविला जातो. एकजुटीतून राबविलेल्या योजनेमुळे दुष्काळी गावांचा शिक्का पुसण्यास मदत झाली आहे.
 - लक्ष्मण वायाळ, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com