मुंबईच्या आयुक्तांकडून पुणेकरांना कोरोनामुक्तीचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढवा, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या, बेड्स आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवा, रुग्णालय आणि डॉक्टरांचे नियोजन करा, असा मंत्र मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुणेकरांना दिला. 

पुणे  : कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढवा, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या, बेड्स आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवा, रुग्णालय आणि डॉक्टरांचे नियोजन करा, असा मंत्र मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुणेकरांना दिला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. विशेषत: आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले आहे. जे मुंबईला जमले ते पुण्याला का जमत नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पूर्वी केला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या अधिकार्‍याचे अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांनाही माहिती व्हावेत, यासाठी पवार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पुण्यात बोलावण्यात आले होते. त्यांनी पुणे येथील सरकारी विश्रामगृहात आज आयोजित बैठकीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याबाबत मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

काय सांगता, पुणे झेडपीला डाॅक्टर आणि नर्स मिळेना...

या वेळी अजित पवार यांनीही, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात यावे. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. संस्थात्मक क्वारंटाईनच्या ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. 
 

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठी एवढा निधी मंजूर

या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

चहल यांची त्रिसूत्री  
1) संशयितांच्या चाचण्या वाढवा, संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या 
2) बेड्स आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवा 
3) रुग्णालय आणि डॉक्टरांचे नियोजन करा 

 
Edited By : Nilesh J. Shende
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidance to Pune officials by Mumbai Municipal Commissioner