अतिवृष्टी, कोरोना अन्‌ आता "हे' नवं संकट...

रवींद्र पाटे 
Friday, 8 May 2020

द्राक्ष उत्पादकांना करावा लागतोय अडचणींचा समान 

नारायणगाव : अतिवृष्टी व कोरोना संकट यामुळे जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादकांना यावर्षी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हंगाम संपताच आर्थिक अडचण बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक पुढील वर्षाच्या तयारी साठी सज्ज झाले आहेत. पुन्हा नव्या जोमाने बागांच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. मात्र, कोरोनाच्या समस्येमुळे कुशल मजूर गावी निघून गेल्याने बागांची खरड छाटणी, वेलीचे टॉपींग आदि कामे ठप्प झाली आहेत. मजुरांअभावी या वर्षी सुरवाती पासूनच द्राक्ष उत्पादकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्या पासून एकामागून एक येत असलेल्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक पुरते हतबल झाले आहेत. 

पुणेकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका, हा परिसर `रेड झोन`मध्ये

तालुक्‍यात द्राक्ष लागवडीखाली सुमारे चार हजार एकर क्षेत्र आहे. मजूर, खते, औषधे, बॉक्‍स, बांबू, तारा, लोखंड, रुट स्टॉक, कलम विक्रेते, खरेदीदार व्यापारी आदी सुमारे एक लाख लोकांना रोजगार देण्याचे काम तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक करतात. निसर्गाने साथ दिल्यास निर्यातक्षम जंबो द्राक्षाचे एकरी दहा टन उत्पादन घेण्यात येथील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. 

आणखी वाचा-बारामतीहून पुण्याला जाणं होणार अधिक वेगवान

या वर्षी फुलोरा अवस्थेत सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात अगाद छाटणी झालेल्या द्राक्ष मण्यांना परिपक्व अवस्थेत क्रॅकींग झाले. या द्राक्षाची विक्री प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये या भावाने करावी लागली. 

आणखी वाचा-पुण्यातील या परिसरात महिला कोरोना पाॅझिटीव्ह

पंधरा ऑक्‍टोबर नंतर छाटणी झालेल्या द्राक्ष बागा अतिवृष्टी पासून वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले. या द्राक्षाचा तोडणी हंगाम मार्च महिन्यात सुरू झाला. व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षाची खरेदी प्रतिकिलो नव्वद ते शंभर रुपये बाजारभावाने करण्यास सुरवात केली. कोरोनाच्या संसर्गामुळे पंधरा मार्च नंतर व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली. लॉकडाऊनमुळे द्राक्षाची विक्री प्रतिकिलो दहा ते वीस रुपये या मातीमोल भावाने नाशिक येथील मनुका उत्पादकांना करावी लागली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या मुळे प्रतिकिलो सुमारे ऐंशी रुपयांचा तोटा झाला. प्रतिकिलो पंचवीस रुपये खर्च करून काही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष नाशिक येथील कोल्ड हाउस मध्ये ठेवली. मात्र, लॉकडाऊन कालावधी वाढल्याने कोल्ड हाउसमध्ये साठा केलेल्या द्राक्षाची मातीमोल भावाने विक्री करावी लागली. 

या बाबत कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, आघाडीचे द्राक्ष उत्पादक गुलाब नेहरकर, जयसिंग वायकर, तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर म्हणाले, "तालुक्‍यात दरवर्षी सुमारे चाळीस हजार टन द्राक्षाचे उत्पादन होते. द्राक्ष विक्रीतून सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते.

या वर्षी जेमतेम दीडशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी या वर्षी प्रतिकिलो पन्नास रुपये खर्च झाला. द्राक्ष विक्रीतून सरासरी प्रतिकिलो चाळीस रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूणच अतिवृष्टी व कोरोनामुळे या वर्षी भांडवली खर्च सुद्धा वसूल झाला नाही.' 

तालुक्‍यात सध्या द्राक्ष बागांची खरड छाटणी, कोवळ्या वेलींचे टॉपींग आदि कामे सुरू आहेत. कोरोनाच्या भीतीने नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार कुशल मजूर निघून गेले. स्थानिक मजूर कामावर येण्यास तयार नाहीत. द्राक्ष बागांच्या मशागतीचे काम वेळेत न झाल्यास याचा परिणाम पुढील हंगामात घड निर्मितीवर होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains, corona and now new crisis is facing farmers