
लॉकडाऊन काळात गॅस संपणे, किराणा संपणे, औषधे संपणे म्हटले तर तशा फारच किरकोळ गोष्टी या... पण ही छोटी गोष्ट कुणासाठी तरी डोंगराएवढी होऊ शकते, याचा विचार तरी केला असेल का कुणी? पुण्यात एकएकटे राहणारे अनेक ज्येष्ठ जोडपी आहेत. जे बरेचदा घरपोच सेवांवर अवलंबून असतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे लॉकडाऊन घोषित केल्याने घरपोच सेवा तर बंद झालीच त्यात अनेक जड पिशव्या, सामान तासन् तास रांगेंत थांबून आणण्याची वेळ आली आहे. त्यातही रस्त्यावर राहणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्यांची काळजी अनेकजण घेत आहेत. मात्र ज्येष्ठांना लागणाऱ्या छोट्या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीयेत. कसे बसे बाहेर पडावे, तर कोरोनाची सर्वाधिक भीती ही ज्येष्ठांनाच असल्याने जीव वर खाली होतो. त्यातच कधी गुडघे दुखी असल्याचे शरीर आठवण करून देते तर घराच्या पायऱ्या उतरताना मणका विचारतो, कुठे निघलात?
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यातील निलांबरी जोशी यांच्याकडे स्वतःच्याच घरात तीन ज्येष्ठ असल्याने त्यांना या अडचणी जवळून दिसत होत्या. लॉकडाऊनमध्येच बाबांचा चष्मा तुटला. आता ना कुठे चेकअप अवेलेबल होतं, ना कुठे चष्मा बनवून देणारा! याकाळात थोडीशी तडजोड करत चष्मा चिकटवला व तो नाकावर राहू शकेल, अशा परिस्थितीत आणला. त्या स्वतः तिथे असल्याने बाबांचा प्रश्न सोडवू शकल्या, पण असे अनेक ज्येष्ठ होते ज्यांचे प्रश्न सोडवायला कुणीच आजूबाजूला नव्हते. निलांबरी यांनी अशा ज्येष्ठांचा आधार व्हायचे ठरवले आणि सोशल मिडीयावर स्वतःचा मोबाईल नंबर देत ज्येष्ठांना मदत लागल्यास फोन करण्याचे आव्हान केले. त्यानंतर त्यांना बरेच मदतीसाठीचे फोन आले. अनेकांनी तर ही सुविधा सुरू केल्याचे धन्यवादही मानले.
माझ्या बायकोचे वय ८० आहे. तर माझे त्याहून अधिक आहे. तिच्या श्रवणयंत्राचे सेल संपले होते. ते नसेल तर ऐकू येत नसल्याने ती फारच भांबावली होती. मला काय करू तेच सुचेना. सेल ही तशी फारच किरकोळ गोष्ट होती. पण आमच्यासाठी ती अपंगत्वाचा आधार देणारी होती. मेडीकलमध्येही सेल मिळाले नाहीत. एका ठिकाणी सेल मिळणार होते, मात्र आम्हाला जाऊन ते आणावे लागणार होते. आमच्या वयोमानानुसार ते अशक्य होते. अशावेळी निलांबरी आमच्या मदतीला धावून आल्या.
- मधुसूदन निपुणगे, पुणे
मी आणि माझे आई-बाबा शहराच्या विरुद्ध टोकाला राहतो. लॉकडाऊनच्या काळात आईच्या गोळ्या संपल्या. दारात गाडी होती, मात्र ड्रायव्हर नव्हता. स्वतः बाबा घेऊन जाणार तर ते शक्य होणार नव्हते. आईचे डोस डॉक्टरांनी तयार ठेवले होते, मात्र सगळे प्रयत्न करूनही ते आई-बाबांपर्यंत पोचवणे शक्य होत नव्हते. आपण आपल्या पत्नीसाठी काहीच करू शकत नसल्याची खंत बाबांमध्ये जाणवत होती. अशावेळी निलांबरी यांनी घेतलेला पुढाकार आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता.
- श्रुती सुगवेकर, पुणे
आतापर्यंत मी २५ ते ३० ज्येष्ठांना मदत केली आहे. अजूनही मदत चालूच आहे. त्यांच्या अडचणी खूपच छोट्या असतात, पण त्यांच्या वयोमनानुसार त्यांना शक्य होत नसतात. ज्येष्ठांसाठी मदतीला एखादी बाई येत असल्यास त्यांना सोसायटी अडवू शकत नाहीत. परंतु, बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्ली असे प्रकार घडत आहेत त्यामुळे या लॉकडाऊन काळात अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने काही तरी विचार करून उपाय योजना करायला हव्यात. मी स्वतः ही सुविधा लॉकडाऊननंतरही कायमस्वरुपी चालू ठेवणार आहे. मदतीसाठी ज्येष्ठ मला ९८८१४९३६२९या क्रमांकावर फोन करू शकतात.
- नीलांबरी जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.