सासवड महामार्ग ठरतोय धोकादायक कारण...

- श्रीकृष्ण नेवसे 
Saturday, 24 October 2020

- दुभाजक असल्याने उलट्या - सुलट्या धावणाऱ्या वाहनांची गर्दी
- मार्गालगतच्या बेकायदेशीर पार्कींगने तर रस्ता ठरतोय अपुरा 

सासवड (पुणे) : येथे शहरात राष्ट्रीय महामार्गावर वाहने कुठूनही कुठे चालतात. जाण्या - येण्याच्या मार्गाचा नियम न राखल्याने. जवळच जायचे म्हणून विरुध्द बाजूने वाहने दामटली जातात. तसेच रंबल, स्पिड ब्रेकर चुकविण्यासाठी विरुध्द बाजूकडूनही वाहने घुसविली जातात, त्यातून अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र त्यात सुधारणा होत नाही. विविध व्यावसायिकांकडे जाण्यासाठी महामार्गावरच वाहने लावली जातात. त्याला पोलीसही आवर घालू न शकल्याने बेशिस्त वाहतुकीचे सासवड (ता.पुरंदर) शहरात नित्यपणे दर्शन घडते आहे. 

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच
 

शहर नगरपालिका, पोलीस ठाणे व तालुका प्रशासन मिळून सासवड शहरातील विविध वाहननिहाय पार्किंग, गावठाणातील एकेरी वाहतुक, एकुणच विविध रस्त्यावरील शिस्तीबाबत तीन वर्षांपूर्वीच नियोजन करणार होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात अर्धा डझन पोलीस निरीक्षक बदलून गेले. तहसील कार्यालयात यावर तीन वर्षीत सहा बैठका झाल्या, मात्र कोणीही पुढाकार घेऊन वाहतुकीला शिस्त लावली नाही. त्यामुळे शहरात कोणी कुठेही दुचाकी, चारचाकी, अगदी मालमोटारी उभ्या करुन खुशाल जातात. त्याचा वाहतुकीला अडथळा येत आहे. पदपथावर बसलेल्या भाजी, फळविक्रेत्यांकडील ग्राहक तर अगदी रस्त्यावरच वाहने उभी करुन खरेदी करीत असतात. त्यातच कितीतरी जण जवळ जायचे आहे, म्हणून उलट्या दिशेने येत असतात. त्यातून जे वाहनचालक नियम पाळतात.. त्यांची अडचण होताना दिसते. 

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

ग्राहक कमी अन् बाजारपेठेत कोंडी..

सासवड शहराचा आठवडे बाजार सोमवारी असतो, त्यामुळे बाजारपेठ बंद वारी म्हणजे शनिवारी माल घेऊन मालमोटारी विविध दुकानांसमोर येत असत. आता लाॅकडाऊनपासून हे विस्कळीत झाले. त्यामुळे शहराच्या बाजरपेठेत विविध दुकानांचा माल घेऊन आलेल्या मालमोटारी आता नित्यपणे दिसू लागल्या आहेत. खरे तर विविध बैठकांत रात्री उशिरा किंवा लवकर सकाळी या मालमोटारीने दुकानांचा माल आणायचा ठरलेले असताना वाहनचालक व दुकानदार नियम पाळत नाही. त्यातून दिवसा मालमोटारी येऊन बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याचीच कोंडी होते. त्यातून ग्राहक कमी अन् बाजारपेठेत कोंडी हा प्रसंग पाहण्यास मिळतोय.

महामार्गाचाच श्वास कोंडलाय...!
''लाॅकडाऊननंतर आता कुठे काही प्रमाणात पीएमएल बसगाड्या सुरु झाल्यात. त्यासाठी उभे राहीलेल्या प्रवाशांना बस पकडता येईल किंवा बसचालकास प्रवासी दिसतील. अशी स्थिती बेकायदेशिर पार्किंगने राहिली नाही. चहा, नाश्ता, स्नॅक्स, भाजी, फळे खरेदीवाल्यांच्या वाहनांनी सासवड शहरात राष्ट्रीय महामार्गाचाच श्वास कोंडलाय. त्यातच हळू हळू अतिक्रमनही वाढत आहे.'' अशी प्रतिक्रिया नितीन मेमाणे, राजेंद्र टकले, चंद्रकांत जगताप, प्रितम म्हेत्रे, जितेंद्र कुंजीर, सुनिलकाका जगताप आदींनी व्यक्त केली.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highway is dangerous for Saswad due to unruly traffic