Vidhan Sabha 2019 : 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज : दानवे

बाबा तारे
Sunday, 13 October 2019

ईडीचा धाक दाखवून पक्षात घेत नाही

- 50 वर्षांत जी कामं झाली नाहीत ती भाजपने 5 वर्षांत केली

पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व शंभर रूपयात गॅस देणार आहोत, असे आश्वासनही दानवे यांनी दिले.

चंद्रकांतदादा यांनी यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे ते बाहेरचे उमेदवार नाहीत. तर इथल्या स्थानिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ते काही चिकमंगळूरहून निवडणूक लढवायला आलेले नाहीत, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. 

बालेवाडी येथे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, डॉ. दिलीप मुरकुटे, आबासाहेब सुतार इत्यादी उपस्थित होते.

मोदीजी, फडणवीसजी बेरोजगारीवर बोला; राहुल गांधींची टीका

दानवे म्हणाले, "काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक देश चालवू शकत नाहीत. म्हणून जनतेने भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने पक्ष नेस्तनाबूत होत आहे. काँग्रेसला तुम्ही आम्ही संपवायची गरज नसून, राहुल गांधी व सोनिया गांधीच संपवतील. प्रत्येक ठिकाणी भाषण लिहून नेणा-या सोनिया गांधी देश चालवू शकत नाहीत. तसेच काँग्रेसकडे सध्या देश चालवू शकेल, असा कोणतेच नेतृत्व नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांनीही पातळी सोडून मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केले असून, जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल. भविष्यात देश चालवायचा असेल तर देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असेच समीकरण असेल, असा पुनर्उच्चारही त्यांनी यावेळी केला. 

ईडीचा धाक दाखवून पक्षात घेत नाही

ईडीचा धाक दाखवून आम्ही कुणालाही पक्षात घेत नाही. उलट पवारांनीच कृष्णराव भेगडेसारख्या आमदाराला सत्तर हजाराच्या घोटाळ्याची भीती दाखवून फोडले होते. त्यामुळे फोडाफोडी आम्ही नाही तर तुम्हीच केली होती. म्हणून फोडाफोडीच्या गोष्टींबद्दल विरोधकांनी बोलू नये. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना बोलायला जागा नसल्याने ते जातीचे राजकारण करत आहेत.

2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज

२०२४ पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व शंभर रूपयात गॅस देणार आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रूपये जमा करणार आहोत. तसेच गरिबांना आयुष्मान योजनेची मदत, ३७० कलम रद्द करण्याबरोबरच मेट्रोचे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे हे सर्व भाजप सरकारने केले. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचेही दानवे म्हणाले.

डोंबिवलीकर म्हणतात, पंतप्रधानसाहेब आमच्याकडं मतं मागायला येऊ नका

50 वर्षांत जी कामं झाली नाहीत ती भाजपने 5 वर्षांत केली

पन्नास वर्षांत झाली नाहीत ती कामे भाजप सरकारने पाच वर्षांत केली आहेत. बाणेर बालेवाडीचा विकास करू हे आमचे आश्वासन असून, चंद्रकांत पाटलांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले. तर मी पुणे पदवीधर मतदार संघातून आमदार झालेला असून.

मी काय गोट्या खेळल्या का? : पाटील

इतकी वर्षे मी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मी काय गोट्या खेळल्या का? असा सवाल करत "मी जसा काय बाहेर देशातून आलो आहे, असा अपप्रचार विरोधक करत आहेत. या सर्व अपप्रचाराला बळी न पडता मला निवडून देऊन विकासाला साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच आमदार मेधा कुलकर्णी यांनीही चंद्रकांत पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन नागरिकांना केले.

अनेकांचा भाजप प्रवेश : माजी महापौर व काँग्रेसचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने व चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने भाजपत प्रवेश केला. तर मनसेचे संदीप जोरी, मनसेचे प्रचारप्रमुख विनोद जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home and free electricity by 2024 to Everyone says Raosaheb Danve Maharashtra Vidhan Sabha 2019