भ्रमंती - सुकृत देव

भ्रमंती - सुकृत देव
Published on

भ्रमंती
हाँगकाँग व मकाऊची अद्‍भुत सहल
- ॲड. सुकृत देव
-------------------------------------
लीड
हाँगकाँगमधील डिस्नेलॅंडला आम्ही भेट दिली. त्याठिकाणी विविध लाइव्ह शोज बघितले, गेम्स खेळलो, फोटो काढलेत, राइड्स केल्यात. आकर्षक रोषणाईने संपूर्ण डिस्नेलॅंड उजळून निघाले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर्सची निघालेली डिस्ने परेड बघण्याची संधी आम्हाला मिळाली.
-------------------------------------

आमच्या टॅक्स बार संघटनेची दरवर्षी सहल निघते. आम्ही सगळे मिळून भारतात किंवा भारताबाहेर विविध पर्यटनस्थळी फिरायला जातो. या सहलीला आम्ही अभ्यास सहलही म्हणतो, कारण या सहलीचा उद्देश केवळ फिरणे हाच नसून, विविध परिषदांना उपस्थित राहण्याचाही असतो. याला आम्ही रिफ्रेशर कोर्स उर्फ रेसिडेंशिअल रिफ्रेशर कोर्स म्हणतो. आतापर्यंत भारतात पाच आणि यावर्षी भारताबाहेर पहिली आंतरराष्ट्रीय सहल काढली. या आमच्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय सहलीच्या निमित्ताने आम्ही हाँगकाँग व मकाऊ येथे गेलो. भारतामध्ये आम्ही गोवा, कूर्ग, मसुरी, हरिद्वार, राजस्थानातील उदयपूर, कुंभलगढ, क्रूझने कोची ते लक्षद्वीप या ठिकाणी जाऊन आलो आहोत. टॅक्स बार संघटनेच्या प्रत्येक सहलीला आम्ही किमान ३० ते ६० जणांचा ग्रुप घेऊन जातो. सहल नीट नियोजन करून, पूर्ण तयारी करून ठरविली जाते. निघायच्या आठ दिवस आधी नाश्‍त्यासाठी एकत्र जमतो. त्यामध्ये सर्व सहभागी व्यक्तींना संपूर्ण सहलीची माहिती दिली जाते. आपण कुठे भेटी देणार आहोत, काय तयारी करायची, कोणत्या प्रकारचे कपडे व वस्तू बरोबर घ्यायच्या वगैरे सगळ्या गोष्टी या मिटिंगमध्ये सविस्तर सांगितल्या जातात. प्रत्येक सहलीमध्ये आम्ही मजा, गप्पा, गाणी, खेळ, छोटी पार्टी व अभ्यासही करतो.

तर, यावर्षीच्या मार्चमध्ये माझ्या अध्यक्षीय पदाच्या कालावधीत आम्ही हाँगकाँग व मकाऊला जायचे ठरविले. विविध ठिकाणांचा विचार केल्यानंतर हाँगकाँग व मकाऊला जाण्याचे निश्चित केले. याचे नियोजन आम्ही डिसेंबरपासूनच सुरू केले होते. तिकीट, व्हिसा, विमादेखील काढला. पण फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू झालेले अमेरिका-इराण युद्ध, वाढती महागाई अशा विविध कारणांमुळे अनेकांनी सहलीला येणे रद्द केले. टूर ऑपरेटरही बदलला आणि शेवटी २८ लोक निश्चित होऊन आम्ही पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून हाँगकाँग-मकाऊला जायला निघालो. हाँगकाँग-मकाऊला जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिसा. मुंबई एअरपोर्टवर व्हिसाची बारकाईने तपासणी केली जाते. या व्हिसातील सर्व माहिती पासपोर्टमधील माहितीशी तंतोतंत जुळणे खूप गरजेचे असते, नाहीतर तुम्हाला जाता येत नाही. उदाहरणार्थ, पासपोर्टवर पुणे, महाराष्ट्र असेल, तर तसेच्या तसे व्हिसावरही असले पाहिजे. माहिती न जुळल्यास परत ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. यात बराच वेळ वाया जातो. जरादेखील पत्त्यामध्ये, नावात स्पेलिंगच्या चुका चालत नाहीत, हे ध्यानात असू द्यावे. आम्ही सर्वजण थेट विमानाने मुंबईहून हाँगकाँगला पोहोचलो आणि हाँगकाँग एअरपोर्टहून मकाऊसाठी निघालो.

हाँगकाँग ते मकाऊ बसने जाण्याची वेगळीच मजा वाटली. कारण समुद्रावरून ५५ किलोमीटरचा मोठा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ (एचकेझेडएम) ब्रिजवरचा प्रवास,सभोवतालचे निसर्गरम्य दृश्य, आल्दाददायक वातावरण डोळे आणि मन दोहोंना सुखावणारे होते. मकाऊ शहराला ‘लास वेगास ऑफ द ईस्ट’ म्हटले जाते. मकाऊ मानवनिर्मित शहर आहे. येथे अनेक कॅसिनो उभारले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो. विशेष म्हणजे येथे जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे मकाऊ ‘कॅसिनो शहर’ म्हणूनही ओळखले जाते. मकाऊमध्ये हॉटेल गॅलेक्सी, हॉटेल व्हेनेशिअन मकाऊसारखे फाइव्ह व सेवेन स्टार आलिशान हॉटेल्स आहेत.

आम्ही संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी मकाऊ शहराचा दौरा केला. शहरात संध्याकाळच्या वेळी होणारा म्युझिकल वॉटर फाउंटन शो किंवा डायमंड शो प्रसिद्ध आहे. त्यामुळे तो आवर्जून बघितला. त्याचबरोबर आम्ही पॅरिसियन बाग, फिशरमन व्हार्फ हे थीम पार्क, लोटस स्क्वेअर, अ-मा टेम्पल ही प्रेक्षणीय स्थळे बघून रात्री कॅसिनोमध्येही गेलो. व्हेनेशिअन मकाऊ हे मकाऊमधील मोठे हॉटेल कम मॉल बघितले. या हॉटेलच्या आतमध्ये स्काय वॉक, बोटिंग ऑन रिव्हर करायची सुविधा आहे. तसेच व्हेनिस या शहराची प्रतिकृतीही याठिकाणी तयार केली आहे. त्यामुळे हे हॉटेल येथील आकर्षण ठरते. मकाऊमध्ये एक दिवस राहून आम्ही हाँगकाँगला जाण्यासाठी निघालो. दुपारी हाँगकाँगमध्ये सुन ट्रक टर्मिनल येथे फेरी राइडसाठी पोहोचलो. ही फेरी समुद्रातून फास्ट स्पीड बोटने ५० मिनिटांत हाँगकाँगला पोहोचवते.

हाँगकाँग हे जगातील एक मोठे आर्थिक केंद्र, व्यावसायिक बंदर, श्रीमंत व विकसित शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जगातील अनेक श्रीमंत लोक राहतात किंवा त्यांची घरे आहेत. हाँगकाँगचे चलन हाँगकाँग डॉलर्स आहे. आम्ही तिसऱ्या दिवशी हाँगकाँग बघायला निघालो. सर्वप्रथम आम्ही व्हिक्टोरिया पीक बघायला गेलो. हा हाँगकाँगमधील सर्वांत उंच डोंगर आहे. या डोंगरावर जाणाऱ्या ट्रॅममध्ये बसण्याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. व्हिक्टोरिया पीकवर भरपूर फोटो काढलेत. आम्ही डोंगरावर गेलो, त्यावेळेस तिथे गार वारे वाहत होते, ऊन नव्हते, धुके पसरले होते. आल्हाददायक हवेमुळे तिथे खूप प्रसन्न वाटत होते. आम्ही रात्री स्टार फेरी राइड आणि लाइट शो बघितला. चौथ्या दिवशी आम्ही हाँगकाँगमध्ये प्रसिद्ध असलेले डिस्नेलँडला गेलो. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत आम्ही तिथे फिरलो. डिस्नेलॅंडमध्ये आम्ही विविध लाइव्ह शोज बघितले, गेम्स खेळलो, फोटो काढलेत, राइड्स केल्यात. आकर्षक रोषणाईने संपूर्ण डिस्नेलॅंड उजळून निघाले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर्सची निघालेली डिस्ने परेड बघण्याची संधी आम्हाला मिळाली. रात्री नऊ वाजता फायर शो व लाइट शो बघितला. शोच्यावेळी सुंदर दृश्य बघायला मिळतात. हे शोज बघणे सुखद अनुभव होता. तिथून आम्ही रात्री दहा वाजता भारतीय हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. जेवण करून आम्ही राहत असलेल्या हॉटेलला परतलो.

हाँगकाँगमधील आमचा पाचवा आणि शेवटचा दिवस आम्ही खास फिरण्यासाठी राखीव ठेवला होता. त्यादिवशी आम्ही केबल कार राइडने तुंग चुंग स्टेशन ते उंच पर्वतावरच्या न्गोंग पिंग स्टेशनपर्यंत गेलो. ही राइड म्हणजे स्वर्गाचा प्रवासच जणू. या राइडने वर जाताना संपूर्ण हाँगकाँग शहर, समुद्र, समुद्रावर बांधलेले पुल आणि हाँगकाँग एअरपोर्ट दिसले. डोंगरावरून जाताना जणू ढगांमधून जात आहोत, असे जाणवले. त्यात थोडा पाऊसही आला होता त्यामुळे अवर्णनीय निसर्गसौंदर्य मन मोहीत करत होते. अशा सुंदर दृश्‍यांचा फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही.

आम्ही वर न्गोंग पिंग स्टेशनला पोहोचलो. त्या ठिकाणी असलेल्या मार्केटमध्ये खरेदीही केली. तिथे बघण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे, पो लिन मोनस्टरी हे बौद्ध मंदिर व डोंगरावर असलेली भलीमोठी बुद्धाची मूर्ती. तिथे पायऱ्या चढून आम्ही वर गेलो. मन भरून फिरल्यानंतर संध्याकाळी खाली हाँगकाँगमध्ये आलो. शेवटचा दिवस होता, हाँगकाँगमधील पदार्थ खाऊन आम्ही बऱ्यापैकी कंटाळलो होतो. म्हणून इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. हाँगकाँगमध्ये शुद्ध शाकाहारी लोकांचे तसे हालच. पण इंडियन रेस्टॉरंटमुळे आम्ही वाचलो. या पाच दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी भरपूर खरेदी केली. आम्ही सर्वांनीच वेगवेगळ्या ठिकाणी विविध वस्तूंची, विशेषतः सुव्हनिअर्सची खरेदी केली.

शेवटच्या दिवशी आमच्याबरोबर असणारी गाइड मे हिने आम्हाला मॉलमध्ये शॉपिंगला नेले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण ते कोणालाच आवडले नाही. आम्हाला पहिल्यांदाच असे जाणवले की, परदेशातही स्ट्रीट शॉपिंगला महत्त्व आहे, आणि हे आपल्या प्रवासाच्या इटिनेररीमध्ये असायला हवे. कारण, मॉलपेक्षा स्ट्रीट शॉपिंगमध्ये खरेदी करणे तुलनेने जास्त परवडते, व स्थानिक वस्तूंमध्ये विविधता बघायला मिळते. आमच्या ग्रुपमधील १४ ते १५ लोक शेवटच्या दिवशी रात्री नऊला जेवण करून हाँगकाँग स्ट्रीट मार्केटला शॉपिंगसाठी गेले. मनोसोक्त शॉपिंग करून ते रात्री दीडच्या सुमारास दोन मेट्रो बदलून आम्ही हाँगकाँगमध्ये थांबलेल्या हार्बर प्लाझा हॉटेलला परतले. आम्ही आमच्या टूर ऑपरेटरला पुढल्या वेळी प्रवासाच्या इटिनेररीमध्ये किमान अर्धा दिवस तरी स्ट्रीट शॉपिंग ॲड करण्यास सांगितले.

अशी ही आमची हाँगकाँग आणि मकाऊची सहल रिफ्रेश करणारी, सहकाऱ्यांसोबतची मैत्री घट्ट करणारी, निसर्गाजवळ नेणारी, मन प्रसन्न करणारी ठरली.

---

ॲड. सुकृत देव पुणेस्थित टॅक्स बार संघटनेचे अध्यक्ष आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com