esakal | अत्यवस्थ रुग्णांना दारे बंद; ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णालयेही अडचणीत

बोलून बातमी शोधा

 ऑक्सिजन
अत्यवस्थ रुग्णांना दारे बंद; ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णालयेही अडचणीत
sakal_logo
By
टीम इसकाळ

पुणे : ऑक्सिजनअभावी कंठाशी आलेला रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांची वणवण सुरू असतानाच अशा अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी आता रुग्णालयांची दारे बंद होत आहेत. पुण्यात पाच हजार नऊशे इतके ऑक्सिजन बेड आहेत आणि बुधवारी अकरापर्यंतच्या आकेडवारीनुसार तितकेच रूग्ण दाखल आहेत. त्यामुळे आता एकही आॅक्सिजनवरील बेड शिल्लक नाही. त्यातच ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असून, गरजेच्या तुलनेत निम्माच ऑक्सिजन मिळण्याची शक्यता असल्याने रुग्णांना कसे घ्यायचे, असा प्रश्‍न रुग्णालये व्यवस्थापनाकडून विचारला जात आहे.

दुसरीकडे, ऑक्सिजनच नसल्याने खासगी कोविड सेंटरने रुग्ण दाखल करून घेणे बंदच केले आहे. वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नसल्याचे सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. परिणामी, काही रुग्णांना बेड मिळाला तरी, उपचार मिळण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, श्‍वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड वाढविल्या असल्या तरीही त्या कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. त्याचवेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही रुग्णालयांतील उपचार थांबण्याची भीती आहे.

हेही वाचा: खंडोबाच्या नावानं चांगभलं! रिंग रोड-रोपवेसाठी केंद्राकडून 56 कोटी

काही सेंटरमधील उपचार बंद

खासगी आणि सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता नसल्यानंतर गेल्या काही दिवसांत खासगी कोविड सेंटर सुरू झाले आहेत. काही सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडही आहेत. परंतु, रुग्णालयांना पुरेसा पुरवठा होत नसल्याने सेंटर तर ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नसल्याचे व्यवस्थापक सांगत आहेत. त्यामुळे काही सेंटरमधील उपचार बंदही केले आहेत. शहरात रोजच्या रुग्णसंख्येत अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. बेड न मिळण्यापासून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचेही सांगण्यात आले. सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १३०० रुग्ण अत्यवस्थ असल्याचे महापालिकेच्या अहवालातून दिसून आले आहे.

हेही वाचा: ऑक्सिजनची गळती झाल्यास काय करावे? कशी घ्यावी काळजी?

पुण्यातील ऑक्सिजन बेड

५ हजार ९००

अत्यवस्थ रुग्ण

१ हजार ३००

ऑक्सिजनवरील रुग्ण

५ हजार ९००

शहरासाठी रोज ऑक्सिजन

३८० टनापर्यंत

सध्याचा पुरवठा

२९० टन

''शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही, यासाठी उत्पादकांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुरवठा वाढविण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात अडचणी येणार नाहीत. पुढच्या चार दिवसांत मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता आहे.''

- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

हेही वाचा: इथे परिस्थिती काय आहे, नेत्यांचं चाललंय काय? लसीकरणासाठी 'दादागिरी'