esakal | इथे परिस्थिती काय आहे, नेत्यांचं चाललंय काय? लसीकरणासाठी 'दादागिरी'

बोलून बातमी शोधा

corona vaccination
इथे परिस्थिती काय आहे, नेत्यांचं चाललंय काय? लसीकरणासाठी 'दादागिरी'
sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : लसीकरणासाठी नागरिक रांगा लावून थांबलेले असताना काही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांशी संगनमत करून लसीकरण केंद्रात घुसून हक्काच्या मतदारांना ‘आत्ताच्या आत्ता लस द्या’ म्हणून दादागिरी करत आहेत. एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने त्यांच्यातील अंतर्गत राजकारणाचा फटका रांगेत थांबलेल्या नागरिकांना बसत आहे. दरम्यान, बुधवारी शहरात २० हजार ४३१ जणांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, मागणीपेक्षा कमी लस उपलब्ध होत असल्याने शहरातील केंद्रांवर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना लशीसाठी वणवण फिरावे लागत आहे. मात्र, शहरातील काही नगरसेवक आपल्या हक्काच्या मतदारांना खूष करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून उपलब्ध लशींपैकी ५० टक्के लसीकरणाचे कुपन राखीव ठेवण्यास सांगत आहेत. त्यामुळे जे नागरिक वशिल्याशिवाय जात आहेत, त्यांच्यासाठी केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: 'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी

नगरसेवकांचे कार्यकर्ते सोसायटी, झोपडपट्टीतील मतदारांना लसीकरण केंद्रांवर घेऊन गेल्यानंतर त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी तेथील डॉक्टर, डेटा एंट्री आॅपरेटर यांच्यावर दबाव आणत असून, त्यातून वाद निर्माण होत आहेत. याबाबत प्रभागातील विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते पालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार करत असले तरी काही नगरसेवकांच्या दादागिरीमुळे शांत बसावे लागत आहे.

कामगिरी दाखविण्यासाठी....

पुण्यातील एका प्रभागात एक लसीकरण केंद्र असले तरी तेथे चार नगरसेवक आहेत. हे चारीही नगरसेवक त्यांची कामगिरी दाखविण्यासाठी मतदारांना लस देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद, पक्षीय मतभेद असल्याने प्रत्येकजण आपल्याच लोकांना लस द्यावी, यासाठी वाद घालत आहेत. तसेच ज्या प्रभागात नगरसेवकांचा समन्वय आहे, तेथे रोज एकजण कुपन राखीव करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार