फॅबीफ्लू लंपास प्रकरण: बेमुदत उपोषण आंदोलन अखेर मागे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

निमगाव केतकी कोवीड केअर सेंटरमधून ९ ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक फॅबीफ्ल्यू गोळ्यांचा साठा चोरुन नेण्यात आला होता. हे प्रकरण गोळ्या परत घेऊन तसेच समज देवून मिटवण्यात आले होते.

इंदापूर (पुणे) : निमगाव केतकी (ता.इंदापूर) कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या फॅबीफ्लू गोळ्या लंपास प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने वरिष्ठ स्तरावरून चौकशी समिती नेमली आहे.

जोपर्यंत ही चौकशी समिती आपला अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत या केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडे आणि आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास डोंगरे यांना सक्तीने रजेवर पाठविण्यात आले आहे. सदर पत्र इंदापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांना पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांच्या उपस्थितीत दिल्याने यासंदर्भात इंदापूर प्रशासकीय भवन समोर सुरू असलेले बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. आरोग्य विभागाची पुणे विभागातील ही पहिलीच कारवाई आहे. 

पुणेकरांनो, आता 5 रुपयांत करा 5 किलोमीटर प्रवास; पुणे- पिंपरींत बससेवेला प्रारंभ​

या संदर्भात ऍड. राहुल मखरे म्हणाले, निमगाव केतकी कोवीड केअर सेंटरमधून ९ ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक फॅबीफ्ल्यू गोळ्यांचा साठा चोरुन नेण्यात आला होता. हे प्रकरण गोळ्या परत घेऊन तसेच समज देवून मिटवण्यात आले होते. मात्र, सेंटरमध्ये कार्यरत परिचारिकेचे फोन संभाषण व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीने २१ ऑक्टोबरपासून इंदापूर प्रशासकीय भवनसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्याची दखल घेतली न गेल्याने २३ ऑक्टोबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव ऍड. राहुल मखरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पारदर्शी पध्दतीने पंचनामे करणे गरजेचे​

जोपर्यंत तुम्ही लेखी तक्रार देत नाही, तोपर्यंत आम्हास चौकशी करता येत नाही, असा पवित्रा पोलीस उप-निरीक्षक गणेश लोकरे यांनी घेतला. यावेळी आंदोलकांनी जेलभरो आंदोलन करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर बाबासाहेब भोंग यांची तब्येत ढासळल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची  दखल आरोग्य प्रशासनाने घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunger strike in Indapur was called off in connection with the theft of Fabiflu tablets