‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं
अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना
Published on

पुणे, ता. ८ : ‘‘भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा पास झालो म्‍हणजे आता ध्‍येय प्राप्‍त झालं किंवा मी सर्वंकष झालो, ही भावना जर त्‍या वेळी माझी असती तर कदाचित तुम्ही आज माझी मुलाखत घेतली नसती. ‘आयएएस’ होणे हा एक प्रवास आहे. आता त्‍यापुढे नेमकं अजून काय प्राप्‍त करायचंय? हा प्रश्‍न पडणं महत्त्वाचं आहे. तुम्‍ही स्वतःला १५ ते २० वर्षांनंतर कोठे पाहता, हे त्‍या वेळी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं.’’ अशा भावना अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केल्या.
‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’तर्फे आयोजित ‘भविष्यवेध - संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक अरविंद जगताप आणि पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली.
मुंढे म्हणाले, ‘‘अधिकारी झालो म्‍हणजे संपले असे नाही. आपण माशासारखं प्रवाहाच्‍या विरुद्ध पोहत जिवंतपणे जगायचे की ओंडक्यासारखं वाहून जायचं हे तुमच्‍या हातात आहे. कदाचित गरिबीमध्ये तुम्हाला कोणाचाही पाठिंबा नसेल. पण फक्त त्याच्यामुळे तुम्ही घडू शकत नाही असे नाही. तुमचं भविष्‍य हे तुम्‍ही आज काय निर्णय घेता, त्‍यावर अवलंबून असते. इथून पुढची १० किंवा २० वर्षांची ही तुमची परिस्थिती असेल, ती आज घेतलेल्या निर्णयांवर असेल. माझं एवढंच सांगणं आहे, आज जो निर्णय घेणार आहात, तो पाठीमागचा आधार न बघता, पुढे बघून घ्या, जगातली कोणतीच ताकद अडवू शकत नाही, असे ते म्‍हणाले. या वेळी त्‍यांनी हलक्‍या फुलक्‍या प्रश्‍नांना खुमासदार शैलीत उत्‍तरे दिली.
अमित रुके यांनी कार्यक्रमाची संकल्पना नमूद केली. वीरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
...........
मुंढे म्‍हणाले...
- गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यूच्या घटना गंभीर बाब
- दूध, पनीर, खाद्यतेल यांसह सर्व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष
- ‘एफडीए’मध्ये मनुष्यबळ कमी असले, तरी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि उपलब्ध अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे या त्रिसूत्रीवर भर
- शाळांच्या परिसरात ५० मीटरमध्ये जंक फूड विक्रीची कडक अंमलबजावणी होणार ................
फोटो ः 40846

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com