पुणे : शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील ६ दिवस...!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

येत्या सोमवारपर्यंत (ता.18) राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारीदेखील (ता.१६) सायंकाळी असेच वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर ढगाळ वातावरण असल्यामुळे शहर आणि परिसरातील किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच पुढील सहा दिवस वातावरण ढगाळ राहील, तसेच शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी सायंकाळी उपनगरांमध्ये आभाळ भरून आले होते. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी कात्रज, हडपसरसह विविध ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नेहमीप्रमाणे वाऱ्याची गती कमी होती. ताशी 25 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहत होते.

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

ढगाळ वातावरणामुळे शहराच्या किमान तापमानात वाढ झाली असून उकाडाही वाढला आहे. दोन दिवसांपासून पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत शहरातील वातावरण हे दुपारनंतर अंशतः ढगाळ राहील, तसेच पावसाची शक्यताही कमी असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.   

- पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात आजवरची उच्चांकी रूग्णसंख्या!

शनिवारी शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)

ठिकाण कमाल तापमान किमान तापमान
शिवाजीनगर 36.7 25. 3 
लोहगाव 37.6 26.1 
पाषाण 34.7 25.1

राज्यातील कमाल तापमानात घट :

गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात लक्षणीय तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये किंचित घट झाली आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता.18) राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळे राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील हवामानशास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD Pune report minimum temperature rise in Pune city