देशाच्या प्रगतीमध्ये अग्रवाल समाजाचा महत्वाचा वाटा : महापौर टिळक

The important contribution of Agarwal community in the countrys progress says Mayor Tilak
The important contribution of Agarwal community in the countrys progress says Mayor Tilak

पुणे (औंध) :."देशाच्या प्रगतीमध्ये अग्रवाल समाजाचा महत्वाचा वाटा असून हा समाज व्यापाराबरोबरच शिक्षण, प्रशासन व राजकारणामध्ये तेवढ्याच तत्परतेने सक्रिय आहे" असे गौरवोद्‌गार पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काढले. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात अग्रवाल समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित जीवनगौरव, अग्ररत्न, अग्रगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी महापौर टिळक बोलत होत्या. 

याप्रसंगी पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, आयकर अधिकारी डॉ. विवेक अग्रवाल, अग्रवाल समाज फेडरेशन पुणेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, व्ही.एल. जैन, अग्रवाल समाज फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बन्सल सचिव राजेश अग्रवाल, मोहीत अग्रवाल, अग्रवाल समाज फेडरेशन महिला अध्यक्षा नीता अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

टिळक म्हणाल्या,"दान, स्वाभिमान व निष्ठेबरोबरच महाराज अग्रसेन यांच्या समाजवादाच्या महान आदर्शांचे विशिष्ट ओळख निर्माण करुन देणारे गुण अग्रवाल समाजात आहेत. अग्रवाल समाज हा भारताचा गौरव आहे. कारण त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. अग्रवाल समाजातील दानवीरांनी आवश्यकता पडेल. तेव्हा समाजाला सहकार्य करुन महाराज अग्रसेनांची कीर्ती वाढविली आहे. अग्रवाल समाज फेडरेशनने गुणवान विद्यार्थी व निस्वार्थी व्यक्तींचा जो सन्मान केलेला आहे तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे." 

डॉ. संचेती म्हणाले, "अग्ररत्न पुरस्काराने सन्मानित डॉक्टर व लेखा परीक्षक (सीए) यांनी  समाजाला प्रेरणा द्यावी. जेणेकरून अशा अनेक समाजरत्नांची निर्मिती होईल. तसेच अग्रगौरव पुरस्कारने सन्मानित पुरस्काराचे विद्यार्थ्यांनीही आपल्या नवीन उर्जेचा उपयोग समाज व देशाच्या विकासासाठी करावा".

फेडरेशनचे पुणे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, "समाजातील निस्वार्थी व सेवाभावी व्यक्तींचा सन्मान म्हणजे संपूर्ण समाजाचा सन्मान असतो. याचप्रमाणे कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करणे हेही समाजाचे एकप्रकारे कर्तव्य आहे. सेवा, प्रतिभा व कर्तव्य यासारख्या महान गुणांमुळेच देश समृद्ध झाला आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांची समाजाला गरज आहे. अग्रवाल समाज फेडरेशन अशा उपक्रमात सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील." यावेळी पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर,लेखा परीक्षक (सीए) यांना अग्रवाल पुरस्काराने व इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना अग्रगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच फेडरेशनच्या वतीने लवकरच रक्तपेढीची स्थापना करणार असल्याचे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. याप्रसंगी अकरा डॉक्टर व अकरा लेखापरिक्षकांना अग्ररत्न पुरस्काराने  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष अग्रवाल व श्वेता अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अग्रवाल समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com