मळद-रावणगाव येथे रस्ता अडविल्याने शेतकर्‍यांची गैरसोय

सावता नवले
Wednesday, 4 November 2020

एकाने पुलाच्या पुढील रस्ता बळजबरीने बंद केल्याने परिसरातील इतर शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्ता प्रशासनाने 

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील मळद येथे शेतकर्‍यांना खडकवासला कालव्यावरून दळणवळणासाठी पाटबंधारे विभागाने पूल बांधला आहे. मात्र कोणताही संबंध नसताना एकाने पुलाच्या पुढील रस्ता बळजबरीने बंद केल्याने परिसरातील इतर शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्ता प्रशासनाने खुला करावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास

पिढीत शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मळद-रावणगाव शिवेवर असलेल्या गट क्रमांक 271 मधून खडकवासला कालवा गेला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे दोन भाग झाले आहेत. यासंदर्भातील कागदपत्रे व नकाशे उपलब्ध आहेत. याच ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पूल बांधला आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांचे दळणवळण चालू होते. मात्र काही दिवसांपूर्वी एकाने कोणताही संबंध नसताना अचानक पुलाच्या पुढील रस्ता बळजबरी, आडमुठेपणाने बंद केला आहे.

याबाबत विचारणा केली असता राजकीय पाठबळामुळे संबंधित व्यक्तींकडून आरेरावीची भाषा वापरली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. रस्ता बंद केल्याने परिसरातील शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक व येजा करण्याची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :  पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के

यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुहास साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले अनेक वर्षांपासून दळणवळण  चालू असलेला रस्ता बंद करणे चुकीचे आहे. रस्ता खुला करण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींना सांगितल्याची माहिती साळुंके यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inconvenience to farmers due to road block at Malad-Ravangaon