esakal | खासगीत ७० टक्के कोरोना रूग्‍णांची वाढीव बिले | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

खासगीत ७० टक्के कोरोना रूग्‍णांची वाढीव बिले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना, तसेच दगावलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्णांना नियंत्रित दरापेक्षा वाढीव बिले आकारण्यात आल्याचा दावा, एका सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाच्या वतीने जिल्ह्यातील १० तालुक्यांत १२१ तक्रारदार रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

नवी पेठेतील एस.एम.जोशी फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित ‘संताप सभे’त ही मांडणी करण्यात आली. यावेळी कोरोना विधवा महिला, समितीचे मयूर बागल, उषा वखारे, डॉ. अभय शुक्ला आदी उपस्थित होते. राज्यभरात समितीच्या वतीने हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यभरात प्रत्येक रूग्णामागे सरासरी एक लाख ८४ हजार वाढीव बिलाची रक्कम आकारण्यात आली होती. पुण्यात हीच रक्कम दोन लाख २६ हजार असल्याचे समितीने म्हटले आहे. डॉ. शुक्ला म्हणाले,‘‘राज्य शासनाने उपचाराचे दर ठरवून दिल्यानंतरही खासगी रूग्णालयांनी अक्षरशः लूटमार केली आहे. अनेक विधवा महिलांना किंवा मृतांच्या नातेवाइकांना कर्ज काढून बिलांचा भरणा करावा लागला आहे. त्यांचा माणूस गेलाय पण अजून न्याय मिळाला नाही. यासंबंधी आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून, लवकरच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहोत.’’ राज्यात दोन हजार ५७९ रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात एक हजार विधवा महिला आहे.

हेही वाचा: महिला चुल आणि मुल यातून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत

मागण्या

  1. रुग्णांच्या बिलांच्या लेखापरीक्षणासाठी आयोग स्थापन करावा

  2. वाढीव बिलातील रक्कम परत मिळावी

  3. दोषी खासगी रुग्णालयावर कारवाई करावी

  4. विधवा महिलांना रोजगाराची व्यवस्था करावी

  5. दिल्ली, राजस्थान, बिहार आदी राज्यातील कल्याणकारी योजना कोरोना विधवांना लागू कराव्यात

  6. दर नियंत्रण आदेशाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी

जलद सर्वेक्षणाचे निष्कर्ष

विधवा झालेल्या ६१ महिलांपैकी ४० महिलांचे वय ५० च्या आत

तसेच यातील २३ महिलांना एक लाखापेक्षा अधिक वाढीव बिल

या सर्व रुग्णांना सरासरी दर दिवशी २२ हजार १७३ रुपयांचे बिल आकारण्यात आले

सर्वेक्षणापैकी फक्त ६.६ टक्के रुग्णांना महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा लाभ मिळाला

एप्रिल महिन्यात पती, सासरे आणि मुलगा यांना कोरोना झाला.त्यांना खासगी रूग्णालयात भरती केले होते. आधीच पतीचा आणि नंतर सासऱ्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी अडीच लाख खर्च झाले. घरातील कर्ते पुरुष गेले, उपचारात सोनं आणि जमापुंजी सर्व गेले. आता कुणाकडे मदत मागू.

- बबिता कोंडे, हडपसर (नाव बदलले)

हेही वाचा: वाघोलीत बीआरटी बस टर्मिनलला मुहूर्त लागणार का?

घरात दोन मुल आहेत. माझे पती खासगी कंपनीत काम करत होते. कोरोनात त्यांचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. भाड्याच्या घरात राहणाऱ्या दिराने आता आश्रय दिला. पण त्यांच्या आश्रयावर किती दिवस राहणार. माझ्या मुलासाठी काहीतरी करायचंय.

- राजश्री वारे, शिरूर (नाव बदलले)

loading image
go to top