IND vs BAN : 'कोहली, कोहली' अन् 'इंडिया, इंडिया'ने दुमदुमला आसमंत

हजारो चाहत्यांच्या गर्दीत भारतीय संघाचे हॉटेलवर स्वागत
IND vs BAN
IND vs BANsakal

पुणे : 'इंडिया, इंडिया', 'कोहली, कोहली' अशा आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून टाकत पुणेकरांनी भारतीय क्रिकेट संघांचे जल्लोषात स्वागत केले. बांग्लादेशच्या संघावर दणदणीत विजय मिळवून हॉटेलवर परतत असलेल्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलजवळ चाहते हजारोंच्या संख्येने जमले होते. संघाची बस येताच आणि लाडक्या खेळाडूंची झलक दिसताच एकच जल्लोष झाला. त्यामुळे या परिसरात सळसळते ऊर्जादायी वातावरण निर्माण झाले होते.

विश्वचषक २०२३ मध्ये गुरुवारी (ता. १९) पुण्यातील गहुंजे मैदानात भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशला सहज मात दिली. सामन्यानंतर भारतीय संघ त्यांचा मुक्काम असलेल्या सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलवर परत येणार होता.

त्यामुळे रात्री साडेनऊच्या सुमारास सामना संपताच हळूहळू हॉटेलच्या परिसरात चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. साडेदहाच्या सुमारास संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांचीही तारांबळ उडत होती. संघाच्या बसला जाण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत होती. काही वेळ लोकांशी त्यांची बाचाबाची देखील झाली.

भारतीय संघाच्या बसची वाट पाहत असताना प्रत्येक जाणार्‍या-येणार्‍या बसला ही संघाचीच बस असल्याचे समजून चाहते घोषणा देत होते. ती भलतीच बस असल्याचे लक्षात आल्यावर हास्यकल्लोळ होत होता. काहीवेळा चाहत्यांनी गमतीने पीएमपीच्या बसेस पाहून देखील घोषणा दिल्या. अखेर सव्वाअराच्या सुमारास भारतीय संघाची बस येताच घोषणांचा आवाज टिपेला पोहोचला.

आजच्या सामन्यात शतक ठोकून सामनावीर ठरलेला आणि चाहत्यांचा लाडका विराट कोहली खिडकीशेजारीच बसला होता. त्याची झलक पाहायला मिळाल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. 'कोहली, कोहली' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर या खेळाडूंची झलक पण पाहायला मिळाली. अखेर बस हॉटेलमध्ये शिरताच चाहते परत घरी निघाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com