esakal | इंदापूर : नो पार्किंग झोनवर पोलीसांचा कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापूर : नो पार्किंग झोनवर पोलीसांचा कारवाईचा बडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर शहरातून जाणारा जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर नगरपरिषदेच्या मालकीचा यावर वाहतूक कोंडी, अतिक्रमण, बेशिस्त पध्दतीने वाहने लावणे कारवाई करताना नेहमी चर्चा होत होती. मात्र, त्यावर चाप बसत नव्हता.

हेही वाचा: मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे

मात्र तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी बेशिस्त पार्किंग, अपघात व अतिक्रमण याकडे लक्ष वेधताच चोवीस तासातच सिंघम पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्ग दर्शनाखाली इंदापूर पोलीसांच्या पथकाने या रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्ये असलेल्या ५६ वाहनांवर कारवाई करून १२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र शहरवाहतूक कोंडी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल विभागासह नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच मुख्य बाजारपेठ अतिक्रमणांचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे मुख्य व्यापारांच्या दुकानासमोर रस्त्यावर दुकाने सुरू झाल्याने तसेच या रस्त्यावर मिळेल तेथे वाहने लावण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होते. अनेकांनी फुटपाथवरील जागा, टपरी व बांधलेले शेड इतरांना देऊन आपली वरकमाई सुरू ठेवली आहे. पंचायत समितीच्या दर गुरुवारच्या नो व्हेईकल डे मुळे इंदापुरात काम करण्यासाठी आलेल्यांची वाहने देखील रस्त्यावर बेशिस्त पध्दतीने लावली जातात.

हेही वाचा: अधिकाऱ्यासह दोघेजण 8 हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

त्यामुळे समस्यांचे निवारण होण्यासाठी शहरात किमान तीन ठिकाणी वाहनतळ होणे गरजेचे आहे. रस्त्या लगत असलेली महत्वाची शासकीय कार्यालये ,स्कूल, कॉलेज, बँका, बसस्थानक असल्याने नेहमी वर्दळ असते. या रस्त्यावर अपघात होवून काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही जणांना अपंगत्व आले आहे.

त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण धारकांची एकदाच यादी करून त्यांचे योग्य जागी पुनर्वसन प्रशासनाने एकत्रित केल्यास शहर अतिक्रमणमुक्त होऊन रस्ते, नागरिक व व्यापारी मोकळा श्वास घेतील. मात्र त्यासाठी प्रशासन, शहरातील सर्व नेते यांनी संवेदनशील होऊन निर्णय घेणे तसेच त्यास शहर वासीयांनी साथ देणे गरजेचे आहे.

loading image
go to top