Dhirendra Shastri : भारत हिंदूराष्ट्र म्हणून ओळखले जाईल; बागेश्वरधाम यांचे प्रतिपादन

आळंदी (ता. खेड) येथे गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त बागेश्ररधाम शास्त्री आले होते, त्या वेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Bageshwardham
Bageshwardhamsakal

आळंदी - ‘अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, तेव्हाच भारतात त्रेतायुगाचा प्रारंभ झाला झाले. यापुढील काळात भारत हिंदूराष्ट्र होणार यात शंका नाही, तसेच हे राष्ट्र गोराष्ट्र म्हणूनही ओळखले जाईल,’’ असे प्रतिपादन धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वरधाम यांनी केले.

आळंदी (ता. खेड) येथे गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त बागेश्ररधाम शास्त्री आले होते, त्या वेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी बागेश्वरधाम शास्त्रींनी ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांचा जयघोष केला. त्यांचा आळंदी देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ, माउलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. शहर भाजपच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी आमदार जगदीश मुळीक, राम गावडे, संजय घुंडरे, किरण येळवंडे, बाळासाहेब चोपदार उपस्थित होते.

गीताभक्ती अमृत महोत्सवात बोलताना बागेश्वरधाम म्हणाले, ‘चुकीच्या पद्धतीने चमत्कार करणाऱ्यांचे गर्वहरण करणारी ही संत ज्ञानेश्वर महाराज यांची पवित्र भूमी आहे. देशभरातील भाविकांनी आळंदीत आले पाहिजे. माउलींचे दर्शन घेतले पाहिजे.’

संतांच्या नामस्मरणाला महत्त्व

महोत्सवात भागवत कथा सांगताना राजेंद्रदास महाराज म्हणाले, ‘‘देशातील निरनिराळ्या राज्यात निरनिराळ्या देवतांचा जयघोष चालतो. अन्य सर्व राज्यांमध्ये देवांचा जयजयकार किंवा नामस्मरण करून साधना केली जाते. मात्र, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे देवांपेक्षाही संतांची महती अधिक आहे. त्यामुळे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा जयघोष होतो. संतांचे नामस्मरण केले जाते. त्यामुळेच येथे येणारा प्रत्येक जण याच संतांना नमन केल्याशिवाय राहत नाही.

गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वरी उपासना, दोन हजार ब्रह्मवृंदांनी सप्तशती पाठ केला. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत ज्ञानेश्वरी पारायण झाले.या मुळे सारे वातावरण मंगलमय होऊन गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्य मंडपात वारकरी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम’चा अखंड जयघोष केला. त्यामध्ये उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यामध्ये रिंगण करून वारकरी पावक्या, फुगड्या खेळले.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्यासह महान साधूसंतांचे आज येथे मला सान्निध्य लाभले आणि भागवत कथा ऐकायला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. येथे आलेल्या साधू-संत तसेच गोविंददेव गिरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीत अग्रणी असलेले गोविंददेव गिरी महाराज यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

- बागेश्वरधाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com