Positive Story:भारतात मार्च 2021पर्यंत उपलब्ध होणार कोरोनाची लस

टीम ई-सकाळ
Friday, 16 October 2020

सध्या जगात रशियामध्ये कोरोनाच्या दोन लसी तयार झाल्या आहेत. त्यातील पहिली लस उपलब्ध करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

पुणे : जगभरात लाखो लोकांचा बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसवर कधी आणि कोणती लस उपलब्ध होते, याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. भारतात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोना वेगानं पसरत होता. सध्या कोरोनाचा आलेख खाली उतरलेला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळं लस कधी उपलब्ध होणार, याची चिंता भारतीयांना लागलीय. भारतात मार्च 2021मध्ये लस उपलब्ध होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

आणखी वाचा - कोरोनानं पुण्यातून ठोकली धूम; जिल्हा होणार कोरोनामुक्त

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनाच्या लसीचं उत्पादन केलंय जातं. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची ही लस असून, सीरम आणि ऑक्सफर्ड यांच्यातील करारानुसार पुण्यात सीरमच्या प्रयोगशाळेत या लसीचं उत्पादन केलंय जातं. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. मध्यंतरी ब्रिटनमधील एका स्वयंसेवकावर लसीचा दुष्परिणाम दिसत असल्याच्या संशय आल्याने मानवी चाचणी थांबवण्यात आली होती. परंतु, तो लसीकरणाचा परिणाम नसल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा मानवी चाचणीला अनुमती देण्यात आली आहे. सध्या जगात रशियामध्ये कोरोनाच्या दोन लसी तयार झाल्या आहेत. त्यातील पहिली लस उपलब्ध करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीची चाचणीही दुष्परिणाम दिसू लागल्यानं थांबवण्यात आलीय. या सगळ्या परिस्थितीत ऑक्सफर्डच्या लसीकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, इंडिया व्हॅक्सिन ऍक्सेसिबिलिटी ई-समिटमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. सुरेश जाधव यांनी सहभाग घेतला होता. त्यात डॉ. जाधव यांनी भारतात मार्च 2021मध्ये लस उपलब्ध होईल, असं स्पष्ट केलंय. 

आणखी वाचा - कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर पडू हे सांगणारा फोटो

भारतात मार्च 2021पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल. एकापेक्षा जास्त जण त्यावर काम करत आहेत. सध्या भारतात प्रामुख्यानं तीन लसींवर काम सुरू असून, त्यातील दोन लसी तिसऱ्या टप्प्यात चाचणी करत आहेत. तर एका लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे आणि आणखी काही कंपन्या या रेसमध्ये उतरत आहेत. मुळात लस तयार करण्याची प्रक्रिया ही किमान आठ ते दहा वर्षांची असते. परंतु, कोरोनाची लस अपवाद असेल. यावेळी आम्ही तिसऱ्यांदा इतक्या कमी वेळेत लस तयार करत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनेच लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
- डॉ. सुरेश जाधव, सीरम इन्स्टिट्यूट, पुणे

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर, आपल्याला एकूण लोकसंख्येच्या 70 टक्के लोकांना लस द्यावी लागेल, तरच संसर्गाची साखळी तोडणं शक्य होईल. आपल्या हातात एकदा लस आली की, आपल्याला अशा हर्ड इम्युनिटीच्या दिशेने पावले टाकता येतील. 
- डॉ. सोमय्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will get covid vaccine by march 2021 serum institute