esakal | Video : पुढील ७२ तासांत राज्यातील 'या' भागात होणार मुसळधार पाऊस!
sakal

बोलून बातमी शोधा

Torrential_Rains

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटक समुद्र किनारपट्टीवर आणि त्याच वेळी झारंखंडमध्येही हवेचा दुसरा चक्रवात निर्माण झाला आहे.   

Video : पुढील ७२ तासांत राज्यातील 'या' भागात होणार मुसळधार पाऊस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मॉन्सून आता पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता.२५) मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात जूनमध्ये पावसाला सुरवात झाली होती. जुलैच्या सुरवातीलाही पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र त्याने दडी मारली ती थेट २२ जुलैपर्यंत. आता तो पुन्हा सक्रिय होत आहे. 

“महाराष्ट्रात पुढील ७२ तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाच्या सरी पडतील. पुढील तीन दिवसांनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होईल,”
- अनुपम काश्यपी, हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी.

हवामान अंदाज 
शनिवार (ता.२५) : कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात काही भागात पावसाची शक्यता
रविवार (ता.२६) कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता.

Video : शरद पवारांना पुण्यातून पाठविली जाणार २५ हजार पत्र; वाचा कोण पाठवणार ही पत्र?​

दृष्टीक्षेपात राज्यातील पाऊस 
- कोकण :
कोकणात सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. १ जून ते २४ जुलै दरम्यान एक हजार ४३६.९ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत एक हजार ६५१.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 
- मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रात जुलैमध्ये ओढ दिलेल्या पावसाला आता परत सुरवात झाली. जूनमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाने सरीसरी ओलांडाली होती, पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाची सरासरी घसरली. आता सरासरीच्या १६ टक्के पाऊस नोंदला आहे. 
- मराठवाडा : दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा आतापर्यंत चांगला पाऊस नोंदण्यात आला. मॉन्सूनमध्ये २५४.३ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ४६ टक्के (३७२.५ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली. 
- विदर्भ : विदर्भात पावसाने मोठी उसंत घेतली. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मिळून सरसरीपेक्षा सात टक्के कमी पावसाची नोंद झाली. तेथे सरासरी ३८५.७ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र आतापर्यंत ३५७.८ मिलीमीटर पडला आहे.  

...म्हणून पंतप्रधानांना देशभरातून केले जाणार १ लाख फोन; काय आहे 'हे' प्रकरण?​

यामुळे मॉन्सून झाला सक्रीय
• पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटक समुद्र किनारपट्टीवर आणि त्याच वेळी झारंखंडमध्येही हवेचा दुसरा चक्रवात निर्माण झाला आहे.   
• गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पुढे गेला होता. त्यामुळे उत्तर आणि ईशान्य भारतात दमदार पाऊस पडत असला तरीही महाराष्ट्रात मात्र पावसाने ओढ दिली होती. हा आस आता पुन्हा सामान्य स्थिती म्हणजे उत्तरेतील मैदानी प्रदेशात आला आहे. 
• या वातावरणामुळे फक्त महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात मॉन्सून सक्रिय झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top