जागतिक तणावाचा बाजारांना फटका

जागतिक तणावाचा बाजारांना फटका
Published on

जागतिक तणावाचा बाजारांना फटका
‘सेन्सेक्स’ १३१२ अंशांनी कोसळला

मुंबई, ता. ११ : अमेरिका- इराण यांच्यात नव्याने तणाव उत्पन्न झाल्यामुळे चिंताग्रस्त वातावरणात आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा दीड ते पावणे दोन टक्के घसरण झाली. ‘सेन्सेक्स’ १,३१२.९१ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ३६०.३० अंशांनी घसरला.
आज निर्देशांकांची सुरुवातच तोटा दाखवीत झाली. कालच्या बंद भावापेक्षा ‘सेन्सेक्स’ ६०० अंश खाली उघडला, तर व्यवहार बंद होताना त्यात आणखीन पाचशे अंश घट झाली होती. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७६,०१५.२८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २३,८१५.८५ अंशांवर स्थिरावला. शेअर बाजाराची ही सलग तिसरी घसरण होती. 
इराणचा नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेने फेटाळल्याने आज जगभरातच निराशेचे वातावरण होते. अशा स्थितीत पुन्हा कच्च्या तेलाचे भाव वाढले. त्यामुळे भारतात चलन वाढ होऊन चालू खात्यावरील तूट वाढेल अशा भीतीने पुन्हा शेअर बाजारात विक्री झाली. त्यातच खुद्द पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केल्यामुळे निराशेत आणखीन भर पडली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले.
कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांचे भाव अडीच टक्क्यांपेक्षा जास्त घसरले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा भावदेखील सव्वातीन टक्के घसरला. सोने दागिनेनिर्मिती कंपन्यांचे भावही आज मोठ्या प्रमाणावर म्हणजेच सात ते ११ टक्क्यांपर्यंत घसरले. पर्यटन कंपन्या, विमान कंपन्यांचे भावही पाच टक्क्यांपर्यंत खाली आले. आज परदेशी वित्तसंस्थांनी जवळपास साडेआठ हजार कोटी रुपयांचे शेअर विकले. तर देशी वित्तसंस्थांनी सहा हजार कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. 
‘सेन्सेक्स’मध्ये सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट या शेअरचे भाव वाढले. तर दुसरीकडे टायटनचा शेअर सात टक्क्यांपर्यंत घसरला. इंडिगो, स्टेट बँक, एअरटेल, एटर्नल, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरचे भावही तीन ते चार टक्के घसरले. महिंद्र आणि महिंद्र, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बीईएल, मारुती, ट्रेंट या शेअरचे भाव दीड ते अडीच टक्के घसरले.

कोट.......
सध्या आपली आर्थिक स्थिती चांगली असल्याने आणि परकी चलनसाठा पुरेसा असल्याने आपण आतापर्यंत कच्च्या तेलाची भाववाढ सहन केली. मात्र, युद्ध लांबले तर अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो.
-विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com