

आळंदी : पिंपरी-चिंचवड प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इंद्रायणी नदीने पुन्हा एकदा मंगळवारी (ता. २०) विषारी फेसाची चादर ओढली. दोन महिन्यांवर आलेल्या कार्तिकी वारीच्या तोंडावर सिद्धबेट ते पुंडलिक मंदिर परिसरात रासायनिक पाण्याने थैमान घातले असून, प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नाकर्तेपणाचा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हतबलतेचा भयावह नमुना आज पुन्हा आळंदीत पाहायला मिळाला. मंगळवारी सकाळपासूनच इंद्रायणी नदीपात्राने अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप धारण केले होते. सिद्धबेट बंधाऱ्यापासून ते थेट ज्ञानेश्वरी मंदिर आणि भक्त पुंडलिक मंदिरापर्यंतच्या संपूर्ण पात्रात रासायनिक फेसाचे पांढरेशुभ्र साम्राज्य पसरले होते.
पाण्याला येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नदीकिनारी उभे राहणेही नागरिकांना आणि भाविकांना मुश्कील झाले होते. चिखली, कुदळवाडी आणि मोई भागातील औद्योगिक कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने ही भीषण परिस्थिती वारंवार उद्भवत आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने नदीतील पाण्याची पातळी आधीच घटली आहे. त्यामुळे नदीत वाहणारे पाणी हे केवळ पिंपरी-चिंचवडमधून येणारे विषारी सांडपाणीच आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या कार्तिकी वारीत राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना तीर्थस्नानासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष सोसावे लागणार आहे. किमान आता तरी पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ कागदी घोडे न नाचवता दोषींवर कठोर कारवाई करावी. दोन महिन्यांवर आलेल्या वारीसाठी आतापासूनच ठोस नियोजन करणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदीकरांनी दिला आहे.
आळंदी नगर परिषदेने या गंभीर समस्येबाबत महापौर रवी लांडगे यांच्याशी अनेकदा चर्चा करूनही उपयोग झालेला नाही. खुद्द महापौरांनी आषाढी वारीदरम्यान नदीची पाहणी करण्याचा केवळ फार्स केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या कारभाऱ्यांनी या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्यानेच आजची परिस्थिती उद्भवली आहे, असा थेट आरोप नागरिक करत आहेत.
मागील आठवड्यात रासायनिक पाण्यामुळे हजारो माशांचा तडफडून मृत्यू.
गेली २० वर्षे इंद्रायणीचे पावित्र्य जपण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्णतः अपयशी.
चाकणमध्ये ‘डाऊ’विरोधात आंदोलन करणारे वारकरी इंद्रायणी प्रदूषणावर मात्र उदासीन.
प्रदूषणामुळे काळवंडलेले पाणी; तीर्थस्नान कुठे करायचे? भाविकांचा संतप्त सवाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.