देवाच्या आळंदीत रंगली पोलिसांच्या तोडपाण्याची चर्चा

police.
police.

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदी येथील मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरूवारी (ता.4) रात्री छापा मारला. मात्र, दर महिन्याला जवळपास पन्नास हजार रूपये देण्याबाबतची तोडपाणी झाल्यामुळे जुगाराचा अड्डा पुन्हा पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

आळंदीत भर लोकवस्तीत आणि तेही मंदिर परिसरात सध्या दोन जुगाराचे अड्डे आळंदी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. एका अड्ड्यासाठी साठ हजार रूपये महिना हप्ता ठरल्याची चर्चा आहे. दुसऱ्या अड्ड्याबाबतही पोलिसांनी कल्पना होती. मात्र छापा मारला नव्हता, तोपर्यंत जुगाराचा धंदा अलबेल चालू होता. चांगले प्रतिष्ठीत लोक या ठिकाणी दिवसा आणि रात्री तासनतास खेळत असत. येथे जुगार खेळणाऱ्यांना मद्य, चहा, कॉफी, नाष्टा जाग्यावर दिला जात असे. त्यामुळे हळूहळू येथे गर्दी वाढू लागली. कोरोनाच्या काळात संचारबंदी असतानाही आळंदीतील या जुगाराने अड्ड्यांवर चांगली बरकत होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्री पोलिसांनी छापा मारला आणि खेळाडूंची पळापळ झाली. त्यानंतर सुमारे पन्नास हजार रूपये महिना हप्ता देण्याबाबत मोठी तोड झाल्याची चर्चा आहे. 

मुळात मंदिरासारख्या महत्वाच्या परिसरात जुगार अड्डा रोजरोस चालतो, हेच आळंदीकरांसाठी लांच्छनास्पद आहे. मात्र यामध्ये चिरमिरी नाही तर भरघोस मलिदा मिळत असल्याने सर्वकाही दुर्लक्ष करण्याचा प्रकार आळंदीत पोलिस प्रशासनाचा आहे. वडगाव रस्त्यालाही एका मंगल कार्यालयात काही राजकिय मंडळी राजरोस जुगार खेळत आहेत. एकंदर यापूर्वी दारू, मटका, गांजा, अवैध लॉज होतेच. मात्रा आता जुगाराची भर पडली. संचारबंदी लागू झाल्यापासून तर या अवैध धंद्यामध्ये बरकत आली. आळंदीत पहाटेवेळी गांजाही मोठ्या प्रमाणात विकला गेला. शहराच्या मध्यवर्ती भागात गांजा आणि दारूची विक्रीही पोलिसांच्याच आशीर्वादाने सर्रास सुरू आहे.

आळंदीच नव्हे तर आळंदी परिसरातील चऱहोली, हनुमानवाडी, केळगाव, मरकळ, गोलेगाव, कोयाळी या गावातही अवैधरित्या दारू विकली जाते. औद्योगिक भाग असल्याने हॉटेल आणि ढाबा व्यावसायिक जादा आहे. मद्याशिवाय हे धंदे चालत नसल्याने इथेही पोलसांच्याच आशीर्वादने मद्याची विक्री होत आहे.

आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र चौधर आळंदी पोलिस ठाण्यात अडिच वर्षांपूर्वी रूजू होण्यापूर्वी अवैध धंद्यांचे प्रमाण कमी होते. नव्याने रूजू झाल्यावर अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन त्यांनी आळंदीकरांना दिले होते. मात्र, त्यांच्याच काळात धंद्यांना बरकतही आली. परिणामी पोलिसांच्या कारभारात चर्चा तर होणारच.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com