
या नव्या वर्षात मेट्रोमधून दोन्ही शहरातील नागरिक प्रवास करू शकतील अशी अपेक्षा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी "सकाळ'च्या संपादकीय विभागाशी चर्चा करताना व्यक्त केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलण्याची क्षमता असलेल्या महामेट्रोच्या "मेट्रो प्रकल्पा'चे काम आता वेगाने सुरू झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात महामेट्रोला यश आले आहे. या नव्या वर्षात मेट्रोमधून दोन्ही शहरातील नागरिक प्रवास करू शकतील अशी अपेक्षा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी "सकाळ'च्या संपादकीय विभागाशी चर्चा करताना व्यक्त केली. मेट्रो हा केवळ वाहतूक प्रकल्प नाही तर नागरिकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता त्यात आहे, असेही ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
शहरी जीवनात मेट्रोची भूमिका नक्की कशी असेल?
दीक्षित - आधुनिक काळात दळणवळण महत्त्वाचा घटक झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 75 लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. स्वाभाविकपणे दोन्ही शहरांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे. त्यावर मेट्रो हा ठोस उपाय आहे. मेट्रोने केवळ वाहतुकीच्या समस्येचे निराकरण होणार नाही तर लोकांच्या जगण्याची पद्धतच बदलून जाईल. येत्या काळात मेट्रो ही लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनेल. प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल. सध्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मेट्रोमुळे त्यांचा प्रवास सुखकर होईल. त्यातून लोकांचे जीवनमानच बदलून जाईल.
हेही वाचा : संकट आलं पण काम थांबलं नाही; सीरममध्ये कर्मचारी आले कामावर, लशीची खेपही रवाना
पुणेकरांना या वर्षी मेट्रोने प्रवास करता येईल का?
नक्कीच, या वर्षीच्या मध्यापर्यंत दोन्ही शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यांचे काम पूर्ण होईल. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रोतून प्रवाशांना प्रवास करता येईल. त्यासाठीचे नियोजन राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावर सुरू आहे. लॉकडाउनचे संकट असतानाही आम्ही 48 टक्के काम पूर्ण केले असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित काम पूर्ण होईल. प्रवाशांना त्यांची वाहने न वापरता मेट्रोतून प्रवास करून कमीतकमी खर्चात आणि कमीतकमी वेळेत कामावर जाता येईल. मेट्रोत महिलांसाठी स्वतंत्र कोच असेल त्यात त्यांच्या सुरक्षेचा आणि सोयीसुविधांची संपूर्ण विचार केला आहे. मोबाईल चार्जिंगपासून अनेक सुविधा त्यात उपलब्ध असेल.
मेट्रोच्या स्थानकांचे वेगळेपण काय असेल?
मेट्रोसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून 30 स्थानके आहेत. त्यातील सात स्थानके भुयारी मार्गात असेल. स्वारगेट चौकात बहुमजली ट्रान्झिट हब साकारत आहे. जमिनीखाली सुमारे तीस मीटरवर भुयारी मेट्रोचे स्थानक असेल. तसेच त्यातूनच प्रवाशांना एसटी, पीएमपी, मेट्रोमध्ये चढउतार करता येईल. या हबमध्ये रिक्षा स्थानक, कॅब, पार्किंग आदी सुविधा असतील. शिवाजीनगर न्यायालयाजवळही असेच ट्रान्झिट हब विकसित करण्यात येत आहे. प्रवासी केंद्रित सुविधांचा त्यात समावेश असेल. मेट्रोच्या दोन्ही शहरातील सर्व स्थानकांची रचना स्थानिक संस्कृतीला अनुकूल अशी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रचनाकाराकडून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच या स्थानकांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधांचा समावेश असेल.
पुरुषांनी घरकामात अधिक लक्ष द्यावे; पुणेकर महिलांचे म्हणणे
मेट्रोने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी काही मॉडेल विचारात घेतली आहे का?
केंद्र, राज्य आणि दोन्ही महापालिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मेट्रोमध्ये केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनीही वित्त पुरवठा केला आहे. त्याचा संपूर्ण परतावा "तिकीटां'च्या माध्यमातून मिळणार नाही. त्यासाठी "नॉन तिकीट रेव्हेन्यू'ची व्यवस्था आम्ही उभारत आहोत. त्यातून मेट्रोला 40 टक्के उत्पन्न मिळेल आणि उर्वरित 60 टक्के रक्कम तिकीटांमधून मिळेल. तसेच वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), मेट्रो स्थानकावरील व्यापारासाठीच्या सुविधा, अतिरिक्त बांधकाम यातूनही मेट्रोला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यापासून पाच ते सात वर्षात ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल. यासाठी नियोजन करण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीचा काटेकोर प्रयत्न केला जाईल.
मेट्रोचे काम वेगाने व्हावे यासाठी काय प्रयत्न केले?
देशातील सर्वच सार्वजनिक मोठ्या प्रकल्पांना पूर्ण व्हायला उशीर लागतो. त्यामुळे खर्च वाढतोच; त्याचबरोबर व्यवस्थांवर ताणही निर्माण होतो. पुणे आणि नागपूरमधील दोन्ही मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. पुणे प्रकल्पासाठी आयटी सोल्यूशन्स आणि पूर्णतः स्वयंचलित कार्यप्रणालीचा आम्ही वापर केला आहे. यामुळे कामांना प्रचंड गती आली आहे. पुण्याचा पहिलाच प्रकल्प आहे की ज्याची अंमलबजावणी अत्याधुनिक स्वयंचलित पद्धतीने होत आहे. जमीन हस्तांतरण, राष्ट्रीय स्मारके, कचरा प्रकल्पावर उभा राहिलेला कोथरूड येथील डेपो, न्यायालयीन दावे अशा अनेक आव्हानांचा सामना करत, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून तसेच दोन्ही महापालिकांकडून पुरेसा निधीही महामेट्रोला उपलब्ध होत आहे. तसेच विविध शासकीय विभागांकडूनही अपेक्षित असलेले सहकार्य मिळत आहे. प्रशासकीय समन्वयामुळेच आणि लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर मेट्रो वेळेत दोन्ही शहरांमध्ये धावणार आहे.
..'ते' अखेरपर्यंत आगीशी झुंजत राहीले !
मेट्रोचा विस्तार कसा अपेक्षित आहे?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता सुमारे दीडशे किलोमीटरच्या मेट्रो मार्गांची आवश्यकता आहे. दोन्ही शहरांमध्ये आणि उपनगरांच्या भोवती मेट्रोचे जाळे निर्माण होऊ शकते. तसेच कात्रज, वाघोली, चांदणी चौक, निगडी, तळेगाव, चाकण आदी भागातील मेट्रोमार्गांसाठी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरही मेट्रोमार्ग सुरू करावा अशी रहिवाशांची मागणी आहे. त्यासाठीही नियोजन करण्यात येत आहे. दोन्ही शहरातील नागरिकांचा मेट्रोला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे आमचा हुरूप वाढला आहे.
- सायकल बरोबर घेऊन मेट्रोतून प्रवास शक्य.
- प्रवाशांना स्मार्टकार्डद्वारे प्रवास करता येणार.
- मेट्रोसाठी मुठा नदीच्या पात्राखालून लवकरच बोगदा होणार.
- मेट्रोच्या सर्व स्थानकांमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वयंचलित जिने.
- सात वर्षात मेट्रो आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणार