..'ते' अखेरपर्यंत आगीशी झुंजत राहीले !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

सीरम इन्स्टिट्युटमधल्या आगीची घटना कानावर येताच अग्निशामक दलाच्या एक, दोन नव्हे तर 15 अग्निशामक बंब अन्‌ 50 जवानांची फौज मांजरीच्या दिशेने रवाना झाली. वाटेतल्या वाहतुकीचा अडथळा पार करीत अग्निशामक दलाचा ताफा जेमतेम सात मिनीटात सीरमच्या दारात पोचला, क्षणाक्षणाला हवेत झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा अन्‌ धुराच्या लोटांशी सामना. रौद्ररुप धारण केलेल्या आगीला तीन ते साडे तीन तासात रोखले.

पुणे - सीरम इन्स्टिट्युटमधल्या आगीची घटना कानावर येताच अग्निशामक दलाच्या एक, दोन नव्हे तर 15 अग्निशामक बंब अन्‌ 50 जवानांची फौज मांजरीच्या दिशेने रवाना झाली. वाटेतल्या वाहतुकीचा अडथळा पार करीत अग्निशामक दलाचा ताफा जेमतेम सात मिनीटात सीरमच्या दारात पोचला, क्षणाक्षणाला हवेत झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा अन्‌ धुराच्या लोटांशी सामना. रौद्ररुप धारण केलेल्या आगीला तीन ते साडे तीन तासात रोखले.

Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार 

कोरोनासह वेगवेगळ्या आजारांवरील लशींचे उत्पादन सीरमच्या आवारातील इमारतीमध्ये सुरू होते. "एम-एसईझेड ' या इमारतीमध्येही नेहमीप्रमाणेच काम सुरू होते. मात्र तेवढ्यात तिथे अचानक आग लागली. बघता-बघता मांजरीमध्ये धुराचे लोट व घबराटीचे ढग पसरु लागले. पुढे दुपारी 2.33 वाजता मध्यवर्ती अग्निशामक केंद्रास सीरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्यावेळी अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे कार्यालयातच होते. ही आग मोठी असण्याची शक्‍यता वाटल्याने ते स्वतः अग्निशामक दलाच्या एका गाडीसमवेत मांजरी येथे अवघ्या सात मिनीटात पोचले. प्रत्यक्षात आगीचे रौद्र रुप पाहून त्यांनी तत्काळ हडपसर, कोंढवा, मध्यवर्ती केंद्रासह अन्य ठिकाणाहून 12 अग्निशामक दलाच्या गाड्या मागविल्या. त्याचबरोबर "पीएमआरडीए', ऍमनोरा टाऊनशीप व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या तीन गाड्या अशा एकूण तीन गाड्या घटनास्थळी काही मिनीटातच दाखल झाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अग्निशामक दलाच्या गाड्यांना सीरम इन्स्टिट्युटने हडपसरमधील त्यांच्या जुन्या प्रकल्पातून अंतर्गत असलेल्या उड्डाणपुलावरून थेट मांजरी प्रकल्पामध्ये नेण्यासाठी रस्ते खुले करून दिले. त्यामुळे काही मिनीटातच सर्व गाड्या घटनास्थळी पोचून आग विझविण्यास सुरूवात झाली. एकीकडे आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा सुरू होता, तर दुसरीकडे आतमध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यास जवानांनी प्राधान्य दिले. काचेच्या भिंती तोडत, आगीच्या ज्वाळा, धुरांच्या लोटांशी दोन हात करीत पुढच्या काही मिनीटातच धुरामध्ये सापडलेल्या पाच ते सहा जणांना जवानांनी सुखरुप बाहेर काढले. माणसांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले, रणपिसे यांनी स्वतः आगीच्या ठिकाणी जवानांच्या खांद्याला खांदा लावून आग विझविण्यास सुरूवात केली. सहा वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आली. त्यानंतर चौथ्या व पाचव्या मजल्यावर "सर्चिंग' सुरू झाले. तेव्हा पाचव्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह जवानांना आढळून आले. मृतदेह बाहेर काढून जवान पुन्हा आग विझविण्यासाठी रवाना झाले. 

Serum Institute Fire: मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत; सायरस पुनावालांनी केली घोषणा

आग आटोक्‍यात आणताना आलेल्या अडचणी 
- अंगावर येणाऱ्या आगीच्या ज्वाळा व धुराचे प्रंचड लोळ 
- काचेच्या जाड भिंतींची आवरणे 
- ऍल्युमिनीयम पॅनल व कम्पार्टमेंट 
- धुरामुळे जवानांना श्‍वास घेण्यास आलेल्या अडचणी 
- काचा फोडताना करावी लागलेली कसरत 

सीरम आग प्रकरणाचा क्राईम ब्राँचसुद्धा तपास करणार : पोलिस आयुक्त

'ब्रांटो'ची अत्यावश्‍यक मदत 
अग्निशामक दलाच्या अन्य बंब, पाण्याचे टॅंक यांच्या माध्यमातून जवानांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचबरोबर अग्निशामक दलाकडे आग विझविण्यासाठी असलेल्या "ब्रांटो' या अत्याधुनिक यंत्रणायुक्त गाडीलाही घटनास्थळी आणण्यात आले आहे. "ब्रांटो ही तब्बल 70 मीटर उंच असून ती 21 व्या मजल्यापर्यंतची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. सध्या "ब्रांटो'चा उपयोग आग विझविण्यासाठी करण्याबरोबरच आतमध्ये अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही केला जात आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Serum Institute Fire Brigade Jawan MSEZ Building