धरणाच्या पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणाच्या पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच

धरणाच्या पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : मागील काही वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत असलेली खडकवासला धरणाची संरक्षक भिंत दुरुस्त करण्याकडे पाटबंधारे विभागाने अद्यापही दुर्लक्ष केलेले आहे. अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची वाट पाटबंधारे विभाग पाहत आहे काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिकारी मात्र सतत वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेताना दिसत आहेत.

पुणे-पानशेत रस्त्याला लागून असलेल्या खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंतीचा तीस ते चाळीस फूट लांबीचा भाग काही वर्षांपूर्वी कोसळलेला आहे. तसेच या ठिकाणी रस्ताही खचत चालला आहे. संरक्षक भिंत पडलेल्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखादे मोठे वाहन किंवा दुचाकी अंदाज न आल्याने थेट खाली धरणाच्या पाण्यात जाऊ शकते व त्यात नागरिकांचा जीव जाऊ शकतो. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असे अपघात घडून त्यात नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन सदर संरक्षक भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा: राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार; बाळासाहेब थोरातांची शरद पवारांशी चर्चा (व्हिडिओ)

दोन वर्षांपासून 'सकाळ'चा पाठपुरावा

खडकवासला धरणाच्या पडलेल्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून दै.'सकाळ'चा पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा बातमी द्वारे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आललेले आहे परंतु अधिकारी आता माप घेतलेले आहे, इस्टीमेट तयार केलेले आहे, फक्त मंजुरी बाकी आहे अशी 'सरकारी कारणे' सांगून वेळ मारुन नेताना दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतेही काम झालेले नाही.

" दररोज या ठिकाणापासून दुचाकीवरून नोकरीसाठी ये-जा करतो. वाहतूक कोंडी असताना ज्यांना भिंत पडलेली माहित नाही ते नागरिक खुप कडेला गाडी घालतात. तोल गेला तर गाडी थेट धरणात जाऊन एखाद्याचा जीव जाईल. दुर्दैवाने पाटबंधारे विभाग त्याचीच वाट पाहत असावा."

- लक्ष्मण माताळे, ज्येष्ठ शिक्षक, गोऱ्हे खुर्द.

हेही वाचा: सांगलीने दिली राज्याच्या सहकाराला दिशा

" काही दिवसांपूर्वी येथे अपघात झाला होता. दुचाकी झाडाला अडकल्याने एक तरुण थोडक्यात वाचला. मुख्य रस्ता असल्याने वाहणांची वर्दळ असते. तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी." ऋषिकेश मते, पोलीस पाटील, खडकवासला. याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी, "सध्या बोलू शकत नाही" असे उत्तर दिले.

loading image
go to top