गुऱ्हाळात अडकून पडलेल्या मजुरांची दिवाळी होणार गोड; वेठबिगारीतून प्रशासनाने केली सुटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

दौंडमधील पडवी गावामध्ये एका गुऱ्हाळात छत्तीसगडच्या 14 मजुरांची पिळवणूक होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

पुणे : चांगला पगार देऊन राहण्याची सोय केली जाईल, असे आश्‍वासन देत दौंड तालुक्‍यातील एका गूळ व्यावसायिकाने छत्तीसगडमधून काही मजुरांना नोकरी दिली. मात्र ना त्यांना ठरल्याप्रमाणे पगार ना राहण्याची चांगली सोय केली. त्यामुळे 14-15 तास राबवून घेत कामगारांची पिळवणूक करणा-या व्यावसायिकाला दणका देत या मजुरांची तेथून सुटका करण्यात आली आहे.

अंगमेहनती कष्टकरी समिती आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने वेठबिगारीत अडकून पडलेल्या 14 मजुरांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच मजुरांच्या हक्काचे दोन लाख 28 हजार रुपये देखील त्यांना मिळाले आहे. या सर्व मजुरांना विशेष गाडीने छत्तीसगडमधील त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षाची दिवाळी त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.

पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​

याबाबत समितीचे नितीन पवार यांनी सांगितले की, दौंडमधील पडवी गावामध्ये एका गुऱ्हाळात छत्तीसगडच्या 14 मजुरांची पिळवणूक होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी त्वरित मजुरांची सुटका करण्याच्या सूचना दौंडचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांना दिल्या. बुधवारी (ता.28) त्यातील एका वयस्कर मजुराला मारहाण झाल्याचे समजल्यानंतर चंदन कुमार, ओंकार मोरे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते तेथे पोचले. गायकवाड, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, सरकारी कामगार अधिकारी गजानन बोरसे, यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मदतीने कामगारांची पिळवणूक थांबवून त्यांना मूळ गावी पाठवून दिले आहे.

फॅमिली कोर्टमधील तत्काळ दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती; इतर प्रकरणांना 'तारीख पे तारीख'!​

12 ऐवजी केवळ चार हजार पगार :
दरमहा 12 हजार रुपये पगार दिला जाईल, असे व्यावसायिकाने मजुरांना सांगितले होते. मात्र त्यांना 14 ते 15 तास राबवून घेत केवळ 4 ते 5 हजार रुपये दिले जात होते. मजुरांना पुण्याला घेऊन येण्याचा 40 हजार रुपये खर्च देखील त्यांच्या पगारातून कापण्यात आला. या प्रकारामुळे मजुरांना गावी परत जायचे होते. मात्र अडवणूक करुन त्यांना गावी जाऊ दिले जात नव्हते, असे पवार यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaggery workers have finally been released from the clutches of businessman