esakal | अन् 'तो' शेवटी जिल्हाधिकारी झालाच; प्रेरणादायी स्टोरी
sakal

बोलून बातमी शोधा

man.jpg

-देशात १४३ वा येणारा जयंत म्हणतो "माझी नजर गेली, पण दृष्टी नाही"
- अंधपणावर मात करत मिळवले 
घवघवीत यश

अन् 'तो' शेवटी जिल्हाधिकारी झालाच; प्रेरणादायी स्टोरी

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : "इंजिनिअरींग झाले, मस्त पैकी नोकरी सुरू केली. डोळ्यांनी धोका दिला, काळी काळात संपूर्ण दिसणे बंद झाले. संपूर्ण आयुष्यच अंधारमय होतंय की काय अशी अवस्था झाली, मात्र मन खंबीर करून अंधपणावर मात केली. पहिल्याच प्रयत्नात "यूपीएससी' पास झाला, पण तांत्रिक कारणांमुळे पोस्टींग मिळाली नाही. त्यानंतरही खचून न जाता पुन्हा एकदा कठोर परिश्रम करून जयंत मंकले या तरुणाने 'यूपीएससी'मध्ये देशात १४३ वा क्रमांक पटकावला आहे. "माझी नजर गेली आहे, पण व्हिजन नाही " असे ठामपणे सांगत जयंतने त्याच्या यशाचा मंत्र सांगितला.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

जयंत मंकले हा मुळचा बीडचा. शालेय शिक्षण तेथील चंपावती विद्यालयात झाले. सुरूवाती पासूनच अभ्यासात चमकदार कामगिरी तो दाखवत आला. इयत्ता पाचवीत असताना वडिलांचे छत्र हरवले, त्यानंतर जयंत आणि त्याच्या दोन बहिणींचा सांभाळ अाईने केला. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही हे अाईने सांगितले होते. हे लक्षात ठेवून दहावीला, बारावीला ८० पेक्षा जास्त टक्के घेतले. त्यानंतर संगमनेर येथील अमृत वाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून 'मॅकेनिकल इंजिनिअर' ही पदवी मिळवली. 
२०१५ मध्ये जयंतने पदवी प्राप्त केल्यानंतर भोसरीतील एका कंपनीत नोकरी सुरू केली. पण त्याला तेव्हाच "रेटनाइटिस पिंगमेंटोसा' नावाचा आजार झाला. त्यामुळे हळू हळू नजर कमी होत गेली. त्यामुळे नोकरी सोडून दिली. डोळ्यांना दिसणार नाही हे माहित झाल्याने सर्वांना धक्का बसला, नैराश्यात जातो की काय अशी अवस्था होती. पण तेव्हाच 'यूपीएससी'ची तयारी करण्याचा निर्णय घेतला, आणि हा माझ्या आयुष्याचा टर्निंग प्वाईटं होता असे जयंत 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयातील 'पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशन' (पीबीए) येथे लॅपटॉप, मोबाईल कसे वापरायचे याचे प्रशिक्षण घेतले.  त्यामुळे सामान्य व्यक्ती प्रमाणे या वस्तू हाताळू लागलो. आॅडिओ बुकचा मोठा वापर केला.  २०१७ ला पहिल्या प्रयत्नात मी यूपीएससी पास झालो, त्यात ९२३ वा रँक आला. पण तांत्रिक कारणांमुळे मला पोस्टींग  मिळाली नाही. थोडा नाराज झालो, परत तयारी सुरू केली. २०१८ ला अपयश आले, त्यानंतर २०१९ ला पुन्हा अभ्यास करून हे यश मिळाले. हे माझी आई, मित्र, मार्गदर्शक यांचे यश आहे. 

"ज्या विषयाचे आॅडिओ बुक मिळाले नाहीत, ती पुस्तक आई, मित्रांकडून वाचून घेऊन अभ्यास केला, माझ्यासाठी त्यांनी त्रास  सहन केला, असे जयंत मंकले हे सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जयंत लहानपणापासून हुशार आहे, अभ्यास हाच त्याचा छंद. पण अचानक त्याची नजर गेल्याने आम्ही सर्वजण नैराश्यात गेलो होतो. नोकरी सोडल्यानंतर मनोहर भोळे यांनी जयंतला खुप मदत केली.  परीक्षा दिल्यानंतर तो टिळक रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये टेलिफोन आॅपरेटचे काम करत होता. रोज रिक्षाने तो बँकेत जात. पण सध्या लाॅकडाऊन मुळे घरीच होता. त्याचा हा निकाल लागल्यामुळे हे यश आणि आनंद शब्दात व्यक्त करू शकणार नाही. आमच्यावर आलेल्या संकटामुळे  जयंत मनाने खंबीर झाला आणि शेवटी यश त्याने पदरात पाडून घेतले- छाया मंकले, जयंतची आई.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)