German Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...!'

German_Bakery
German_Bakery

German Bakery Blast: पुणे : त्या दिवशी आईकडे पेशंटची गर्दी होती, म्हणून तिने मला आमच्या दवाखान्याखाली असलेल्या जर्मन बेकरीमध्ये केक खायला पाठविले, आईमुळे तिथले सगळेच मला ओळखत होते. केक खाऊन झाला, तेवढ्यात आईच्या असिस्टंटने मला आईने लगेच वर घेऊन यायला सांगितले, तेव्हा खरच आईचा राग आला होता. शेवटी आईकडे गेले, तेव्हा तिला रात्रीही उशीर होणार असल्याने तिने मला माझी मैत्रीण आणि तिच्या आईबरोबर जायला सांगितले. मी त्या दोघींबरोबर त्यांच्या गाडीतून ५ मिनीटांच्या अंतरावर गेले. तेवढ्यात आईचा मैत्रीणीच्या आईला फोन आला. जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला, आई सांगत होती. मैत्रीणीच्या आईने मला सांगितले, तेव्हा जर आईने मला तिथून बाहेर जायला सांगितले नसते तर.. ! तेव्हा ५ वर्षाची असलेली आणि आत्ता १६ वर्षाची असलेली जिजा जाधव तिचा अनुभव उलगडताना त्या सायंकाळचे ते भयावह चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. 

१३ फेब्रुवारी २०१०. परदेशी नागरीकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या जर्मन बेकरीमध्ये तेव्हा खास गर्दी होती ती "व्हॅलेंटाईन डे'ची पुर्वसंध्या असल्याने. सायंकाळी मिनीटातच एका भयंकर बॉम्बस्फोटाने जर्मन बेकरीमध्ये हल्लाकल्लोळ केला. त्या घटनेने १८ जणांचे जीव घेतले आणि ६० जण जखमी झाले, त्यातील काहीजणांना अपंगत्व आले. हे सर्व घडण्याच्या अवघ्या १० मिनीटांपूर्वी जर्मन बेकरीच्या वरच्या मजल्यावरील दंतचिकित्सक डॉ. मानसी जाधव यांचा दवाखाना आहे. यात नेहमीप्रमाणे गर्दी असल्याने डॉ. जाधव यांनी त्यांची मुलगी जिजा हिला खाऊ खाण्यासाठी जर्मन बेकरीमध्ये पाठविले होते. डॉ. जाधव यांच्यामुळे त्यांच्या मुलीलाही जर्मन बेकरीचे सगळे कामगार ओळखत होते.

त्याविषयी जिजा सांगते, "मी लहान होते. मला फार काही कळत नव्हतं. पण बेकरीतील केक मला आवडायचे. त्यामुळे आईकडे गेल्यावर मी बेकरीत जायचे. नेमके त्या दिवशी आईकडे जास्त पेशंट होते. तेव्हा आईने मला बेकरीमध्ये पाठवले. मी माझ्या आवडीचा केक ऑर्डर केला. केक खाणे संपले होते, तितक्‍यात आईच्या असिस्टंटने मला आईने वरती बोलावल्याचे सांगत वर नेले. तेव्हा आईचा खुप राग आला होता. मला आणखी काही वेळ बेकरीत बसुन वेगवेगळे केक खायचे होते.'' 

डॉ. जाधव यांना दवाखान्यात आणखी उशीर होणार असल्याने जिजाच्या मैत्रीणीच्या आईला जिजाला त्यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. तो प्रसंग उलगडताना जिजा सांगते, ‘‘माझ्या मैत्रीणीची आई गाडी घेऊन आली, मी रागानेच तिच्यासोबत गेले. तिथुन पाच मिनिटांच्या अंतरावर आम्ही पोचलो होतो. तेव्हा आईचा मैत्रीणीच्या आईला फोन आला. बर झालं तुम्ही तिला नेले, जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. मैत्रीणीच्या आईने आम्हाला ते सांगितल्यानंतर मीही घाबरले. तेव्हा वाटले कदाचित आईने आपल्याला तिथुन जायला सांगितले नसते तर ? आईवर आपण चिडलो, रागावलो, पण आई होती म्हणूनच आज मी तुम्हाला बोलु शकते.''

'ती' सध्या काय करते ? 
तेव्हा पाच वर्षांची असलेली जिजा आता १६ वर्षांची झाली आहे. सध्या ती औरंगाबाद येथे तिच्या आजी-आजोबांकडे राहाते. सध्या ती ११ वीचे शिक्षण घेत असून जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या जखमा तिनेही जवळून अनुभवल्या आहेत.

आता कोरोनाने कंबरडे मोडले! 
जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटाच्या घटनेनंतर जर्मन बेकरीसह कोरेगाव पार्क परिसरातील बहुतांश व्यावसायिकांना त्या धक्क्यातून सावरण्यासाठी एक ते दीड वर्ष लागले, डॉ. मानसी जाधव सांगत होत्या. "बॉम्बस्फोटाच्या घटनेवेळी झालेला रक्तपात आजही डोळ्यासमोरुन जात नाही. एक वर्ष आम्ही त्यातून सावरलो नव्हतो. बेकरीप्रमाणेच आमचा दवाखाना व या इमारतीत असलेल्या सगळ्याचे मोठे नुकसान झाले होते. वर्षभर काहीही काम करता आले नाही. त्यानंतर हळूहळू चित्र पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र त्या घटनेच्या १० वर्षांनंतर आलेल्या कोरोनाने आमचे अक्षरश: कंबरडे मोडले. आता आयुष्याची सुरुवात दुसऱ्यादा पुन्हा शून्यापासून करीत आहोत," हे सांगताना डॉ. जाधव यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com