पुण्यात ‘जम्बो’ने २०० आयसीयू बेडची घोषणा केली; पण प्रत्यक्षात आहेत एवढेच बेड

Corona-patient
Corona-patient

पुणे - गरीब, गरजू रुग्णांना आधार देण्याची घोषणा करीत उभारलेल्या ‘जम्बो कोविड केअर सेंटर’चा पोकळपणा उघड होऊ लागला आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी दोनशे आयसीयू बेड असल्याची नोंद दाखविलेल्या ‘जम्बो’त सोमवारपर्यंत जेमतेम तीसच आयसीयू बेड असल्याचे महापालिकेतील नोंदीवरुन पुढे आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बेडसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरही नसल्याने ‘जम्बो’ तूर्तास देखावाच दिसत आहे. दरम्यान, कराराप्रमाणे रुग्णांना सुविधा पुरविण्याची ताकीद महापालिका प्रशासनाने ‘जम्बो’च्या व्यवस्थापनाला दिली आहे.

कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत असून, ती सोमवारी रात्रीपर्यंत पावणेनऊशेपर्यंत गेली आहे. त्यातील बहुतांशी रुग्णांना ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज आहे. मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत; ती मिळालीच तर उपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण ‘जम्बो’त दाखल होण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, जाचक नियम, अपुऱ्या सुविधा आणि नियोजनाचा अभाव असल्याने रुग्णांना दाखल होण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, अनेक रुग्ण अत्यवस्थ स्थितीत ‘जम्बो’च्या दारात ताटकळत आहेत.

आठशे बेडच्या या सेंटरमध्ये केवळ ३० व्हेंटिलेटर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. ३० पेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेतले तर उपचार करणे शक्‍य नाही, हे जाणून असलेल्या ‘जम्बो’ व्यवस्थापनाकडून रुग्णांना घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सेंटरमध्ये सहाशे ऑक्‍सिजन आणि दोनशे ‘आयसीयू बेड’ची सोय असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते.  

महापालिकेच्या टीमची नजर
‘जम्बो’त रुग्णांना दाखल करून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यासाठी रोज २४ तास महापालिकेची टीम नेमली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक रुग्णाची विचारपूस, त्यांच्या शंका जाणून घेऊन सेवा पुरविण्यात येणे शक्‍य आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. दुसरीकडे, ससून रुग्णालयात उपचार घेत असलेले ऑक्‍सिजनवरील रुग्ण ‘जम्बो’त दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवसभरात १० रुग्ण आले असून, ते टप्प्याटप्प्याने घेतले जातील, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. 

जम्बो सेंटरमध्ये ‘आयसीयू बेड’ उपलब्ध आहेत. मात्र, ज्या प्रमाणात हवेत, त्याची माहिती मागविली आहे. यात कमतरता असेल; तर त्याची कारणे जाणून घेऊन जबाबदार यंत्रणेवर कारवाई होईल; परंतु, गरजूंना उपचार मिळतील, याकडे गांभीर्याने लक्ष देऊ.
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com