शिक्षकांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट; प्रलंबित मागण्यांचा वाचला पाढा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या शिक्षणाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

पुणे : नियमित वेतन आणि निवड वेतनश्रेणी संदर्भातील बऱ्याच प्रस्तावात त्रुटी असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रस्तावातील त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात यावेत. तसेच पूर्णवेळ, अर्धवेळ, विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, याबाबत पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिक्षक उपसंचालकांची भेट घेतली.

Ganeshotsav 2020 : श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; यंदा उत्सवकाळात मंदिरात एन्ट्री नाही!​

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या शिक्षणाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी संघटनेचे प्रा. संतोष फासगे, प्रा. लक्ष्मण रोडे आदींनी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक, सहाय्यक संचालक मीना शेंडकर यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने निवड श्रेणी आणि नियमित वेतनश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव, शालार्थ आयडी संदर्भातील प्रलंबित प्रस्ताव नैसर्गिक तुकडी वाढीचे प्रस्ताव, सेवाखंड क्षमापित करण्याचे प्रस्ताव, नवीन विषय सुरू करण्याचे प्रस्ताव, सेवा दाखले वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव, फरक बिले इत्यादींबाबत आढावा घेण्यात आला.

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

प्रा. फासगे म्हणाले, "नियमित वेतन आणि निवड वेतनश्रेणीचे बरेचसे प्रस्ताव मान्य केले आहेत आणि काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे संबंधितांना कळविले आहे. तसेच शालार्थ आयडी मिळवण्यासाठीचे माध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव मान्य केले आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रस्ताव शिफारस करून विभागीय बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केले आहेत."

विभागीय बोर्ड अध्यक्षांनी बरेच प्रस्ताव मान्य केले आहेत. विविध प्रकारची फरक बिले लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काढता आलेली नाहीत. त्यासाठीचे अर्थसंकल्प सरकारी आदेश येताच शासनाला कळविले जाईल, असे शिक्षण उपसंचालकांनी सांगितले. त्याशिवाय सप्टेंबरअखेरपर्यंत वैयक्तिक मान्यतेबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही उपसंचालकांनी दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior college teachers meet Deputy Director of Education for pending demands