esakal | जुन्नरला गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बोलून बातमी शोधा

losses to farmers
जुन्नरला गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
sakal_logo
By
दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : जुन्नर शहर व परिसरातील गावांतून गुरुवारी (ता. २९ रोजी) सांयकाळी वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लेण्याद्री परिसरात अचानक गारांसह पाऊस सुरू झाला. गोळेगावला २० ते ३० मिलीमीटर आकाराच्या मोठ्या गारा पडल्या. येथील द्राक्षाची एप्रिल छाटणी होऊन नुकत्याच बागा फुटून आल्या होत्या. त्यास गारांचा जोराचा फटका बसून त्या तुटून गेल्या आहेत, पाने फाटली आहेत. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणेच यंदाही घड निर्मितीला मोठा फटका बसणार असल्याचे द्राक्ष उत्पादक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्याची नोंद असली तरी आपटाळे व जुन्नर येथील पर्जन्यमापन केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण २२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. कांदा काढणी शेवटच्या टप्यात असल्याने ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीस आला होता तसेच ज्यांचा काढून शेतात होता तो कांदा भिजल्यामुळे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पिके जोराच्या वादळी पावसाने आडवी झाली आहेत. यावर्षी तालुक्यात मोठया प्रमाणात टोमॅटो लागवड झाली असून कालच्या गारपिटीमुळे लागवड झालेली रोपे मोडून पडली आहेत. टोमॅटो पिकाबरोबर भाजीपाला व फळपिकांना देखील मोठा फटका बसला आहे. आंबा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आपली शेतीची कामे करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

मंडल निहाय नोंदणी झालेला पाऊस पुढील प्रमाणे :- जुन्नर ५३, नारायणगाव २७, ओतूर १६, वडगाव आनंद ०६, बेल्हा ०४, निमगावसावा ०६, डिंगोरे ०५,आपटाळे ९३, राजूर,१० (आकडे मिलिमीटर मध्ये)

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर